"रोज रुपया आणून देईन.' खाटिक म्हणाला.
"वा: छान, आतां देतों पैसे.' असें म्हणून सावकार घरांत गेला.
घरांत पत्नी उभी होती. तिच्या डोळयांत अश्रु आले होते. तिचें तोंड काळवंडलें होतें. 'काय ग, काय झालें. उपास लागला वाटतें ?' सावकारानें पुसलें.

"उपास नाहीं लागला. परंतु तुमची कसाबकरणी हृदयाला जाऊन लागत आहे. हें काय करतां आपण ? सध्यां आपले उपवासाचे दिवस. जैनधर्मांतील पर्युषण ना सध्यां सुरू आहे ? परवां महावीर जयन्ती ना झाली ? जैन धर्मांचे आपण लोक. जैन धर्म अहिंसा शिकवितो. आणि तुम्हीं एका निरुत्साही खाटकाला उत्तेजन देऊन मोठा खाटिक बनवूं पहात आहांत ! काय हें ?' पत्नीच्यानें पुढें बोलवेना.

"अग हा व्यवहार आहे" तो म्हणाला.
"धर्माचा व्यवहाराशीं संबंध नसेल तर त्या धर्माला काय किंमत ? व्यवहार सुंदर व्हावा मंगल व्हावा म्हणून ना धर्म-" तिनें विचारिलें.

"मला चर्चा करावयाची नाहीं. तुम्ही बावळट बायकांनीं यांत पडूं नये-" असें म्हणून तो बाहेर आला.
तीनशें रुपयांची नवीन प्रॉमिसरी तयार होऊं लागली. त्या पवित्र सतीला तें सहन होईना. ती बाहेर आली व म्हणाली 'तुम्ही जर हें असत् कर्म थांबविणार नसाल तर माझा हा सध्यांचा उपवास कायमचा होईल.'

ते गंभीर शब्द ऐकून सावकार स्तंभित झाला. त्यानें पुष्कळ वादविवाद केला. परन्तु पत्नीचा निश्चय अभंग राहिला. तिचा ओठधर्म नव्हता. धर्माची खरी निष्ठा तिजजवळ होती. पोथींतील धर्म कृतींत यावा म्हणून तिला तळमळ होती.
"मग करूं तरी काय मी ?' त्यानें विचारिलें.

"हे पैसे त्याला द्याच. परंतु त्याला असें सांगा 'या पैशांतून तुझा टांगा तूं पुन्हां सुरू कर. पूर्वीचें कर्ज तुला माफ. हे नवीन शंभर रुपयेहि तूं फुकट घे. नीट धंदा कर. परंतु कांहीं केल्या खाटीक बनूं नको. तुला तें कार्य करवत नाहीं. चांगलें आहे. तुझा हा स्वभाव वाढूं दे.' असें ती पतीला म्हणाली.

सावकार हतबुध्द झाला. एकीकडे त्याला ३०० रुपये दिसत होते. परंतु दुसरीकडे पत्नीची भीषण गंभीर प्राणार्पणाची प्रतिज्ञा समोर दिसत होती. शेवटीं सत्याचा जय झाला. त्यानें त्या खाटकाला शंभर रुपये दिले. 'मी खाटकाचा धंदा कधीं करणार नाहीं.' असें त्याच्याकडून लिहून घेतलें. पूर्वीचें कर्ज माफ झालें.

तो टांगेवाला भरल्या अंत:करणानें निघून गेला. त्यानें पुन्हां टांगा सुरू केला. आज त्याचा टांगा चांगला चालला आहे. सर्व गांवभर ती गोष्ट पसरली. सतीची स्तुति सर्वजण करूं लागले. खाटकाचा धंदा सोडण्याची इच्छा करणार्‍या त्या टांगेवाल्याचा टांगा लोक मुद्दाम बोलावतात. त्याचीं मुलेंबाळें सुखी आहेत.

हल्लीं जैनांचे उपवास सुरू आहेत. सर्व जैन जमीनदार सावकार कारखानदारांनीं ही गोष्ट ध्यानांत आणून सभोंवतालचा संसार प्रेममय व आनंदमय करण्याची शर्थ करावी; दुसरें काय ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel