मी कम्युनिस्ट आहें. परंतु अहिंसामय वृत्तीचा आहें. अर्थात् हिंसेचा वास येणारे कठोर शब्द मी लिहितों व बोलतों. त्यामुळें मी अनेकांचीं हृदयें दुखविलीं आहेत. निरनिराळ्या निवडणुकी, तसेंच कामगार लढे यांच्याशीं एकरूप होऊन मी अहिंसेच्या उपासकाला न शोभेसा वागलों आहें. श्री.वामन संपत पाटील यांजपासून तों अंमळनेरचे तांबोळी शेटजींपर्यंत व श्री. प्रताप शेटजींपासून तों श्री. काकासाहेब बर्वे यांच्यापर्यंत मी सर्वांना दुखविलें आहे. प्रत्यक्ष हिंसेपेक्षां ही हिंसा अधिक भयंकर असते. कारण हा प्रहार बुजत नाहीं. अत:पर मी जपण्याचें ठरविलें आहे.
साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ
शब्द जैसे वल्लोळ । अमृताचे
हें माझें ध्येय होवो. एक दिवस सर्वत्र मला मांगल्य दिसेल का असें एखाद्या क्षणीं मनांत येऊन माझे हृदय उचंबळतें. तें माझें ध्येयस्वप्न मनासमोर आलें म्हणजे माझा अध:पात मला दिसतो. माझ्या त्या ध्येयासाठीं मी स्वत:ला संयमाग्नींत घालणें अत्यंत आवश्यक झालें आहे. ज्यांना मी दुखवलें आहे त्यांची मी मन:पूर्वक क्षमा मागतों. न्यायमूर्ति रानडे म्हणत, 'विचार कठोर असूं देत. भाषा कठोर नको.'तें खरें आहे. पुनश्च मला पश्चाताप करण्याची पाळी न येवो. खरा पश्चाताप एकदांच होतो. परंतु माझा हा निश्चयहि देवाच्या कृपेशिवाय पार पाडणें कठिण.
नाना म्हणे केशव राजा । केला पण चालवि माझा ॥
१२ डिसेंबर, १९३८.
एकच उपाय
कांग्रेसचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. कांग्रेसचा प्रवेश खेड्यापाड्यांतून होत आहे. बहुजनसमाज कांग्रेसच्या निशाणाखालीं गोळा होत आहे. ठिकठिकाणच्या ज्या निवडणुका झाल्या त्यांत बहुजन समाजांतील पुष्कळ लोक कांग्रेसच्या तिकीटावर निवडून आले.
आपण आज बदलत्या काळांत आहोंत. बदलत्या काळांत फार जपून वागावें लागतें. सहकार्य, सहानुभूति, सद्भाव, परस्परविश्वास यांची अत्यंत जरूर असते. कारस्थानें करण्याची बुध्दि अशा वेळीं दूर राखावी लागते. सर्व व्यवहारांत निर्मळपणा राखण्याची अत्यन्त आवश्यकता असते.
वरचे वर्ग व बहुजनसमाज हे आजपर्यंत दूर दूर होते. फैजपूरला पहिलें ग्रामीण असें कांग्रेसचें अधिवेशन झालें. फैजपूरनें शहरें व खेडीं यांना जोडण्यास आरंभ केला. नवयुगास सुरुवात झाली. परन्तु शहरें व खेडीं यांचा खरा एकजीव अद्याप झाला नाहीं. वरिष्ठ वर्ग व मागासलेले वर्ग यांची तन्मयता अद्याप दिसत नाहीं.
शेटजी व भटजी या वर्गांच्या हातांत आजपर्यंत सत्ता होती. श्रीमंत व धीमंत हे सूत्रचालक होते. आतां बहुजनसमाज जागृत होत आहे. सत्ता आपल्या हातीं असावी असें त्यास वाटत आहे. या गोष्टीचें वैषम्य वरच्या वर्गांस वाटतां कामा नये. बहुजनसमाज हातांत कारभार घ्यावयास उत्सुक असेल तर आपण आनंद मानला पाहिजे.
कांग्रेसच्या झेंड्याखालीं बहुजनसमाज येत आहे. निरनिराळ्या म्यु.टींत, बोर्डांत कांग्रेसच्या नांवानें तो शिरला आहे. तेथें आपण अधिकाराच्या व मानाच्या स्थानावर असावें असें त्यास वाटत आहे. या लोकांस तेथें बसवलें तर कारभार नीट चालेल कीं नाहीं याची खात्री पूर्वीच्या वरिष्ठ वर्गांतील कार्यकर्त्यांस वाटत नाहीं. अशा वेळेस काय करावयाचें?