काँग्रेसला बळकट करा

कांग्रेसची संघटना आतां चैतन्यमय झाली पाहिजे. आतां लेचेंपेचें काम चालणार नाहीं. पोलादी संघटना आतां हवी. कांग्रेसचे ताणेतणावे सर्वत्र पसरले पाहिजेत. देशभर जाळें विणलें गेलें पाहिजे. हरिपुरा येथें कांग्रेस झाली. त्या कांग्रेसचा कोणता संदेश आहे ? संघटना हा एकच संदेश आहे.

कांग्रेसची संघटना करावयाची म्हणजे काय करावयाचें ? तालुक्यांत सर्वत्र कांग्रेस कमिट्या स्थापन करावयाच्या. ज्या गांवाला कांग्रेस कमिटी नाहीं, तो अभागी गांव. असा अभागी गांव अत:पर राहतां कामा नये. गांव चार घरांचा असेना, तेथें सरकारी पोलीस पाटील आहेत. त्याप्रमाणें आमच्या कांग्रेसची बैठकही प्रत्येक गांवीं हवी.

कांग्रेस कमेटीनें काय करावयाचें ? गांवांतील सर्व गोष्टींकडे पहावयाचें. गांवांत विहीर आहे कीं नाहीं, रस्ता नीट आहे कीं नाहीं, पीक कसें आहे.

हिंदु-मुसलमान ऐक्य

कांग्रेसच्या मागील एका अंकांत पारोळ्याचें जें बातमीपत्र छापण्यांत आलें होतें, त्यांत 'मुसलमानांच्या असह्य वर्तनामुळे' असे शब्द आहेत. त्यावर पारोळ्याच्या मुसलमानांकडून असें लिहून आलें आहे कीं, मुसलमानांचे असह्य असें कोणतेंच वर्तन नाहीं. तुम्ही असें लिहून आमची बदनामी केली आहे.

जर माझ्या मुसलमान बंधूंचें असह्य वर्तन होत नसेल तर मला त्याचा अत्यंत आनंद आहे. आपल्या हृदयांतील परमेश्वराला स्मरून जर ते असें सांगत असतील तर त्यावर मी विश्वास टाकतों.

महात्मा गांधी व बॅ.जिना यांच्यात २८ तारखेला फार मोठी वाटाघाट झाली. ती तीन तास सुरू होती. मुंबईच्या अनंत समुद्राच्या तीरावर ही ऐतिहासिक चर्चा झाली. हिंदु-मुस्लीम ऐक्यासाठी समुद्र रात्रंदिवस ओरडून ओरडून सांगत आहे. थोर पुढार्‍यांच्या या प्रयत्नांस यश येवो व भारतमातेचें तोंड तेजानें फुलो.

आपले हिंदु-मुसलमान पूर्वज परस्परांशीं आधींच भांडले, परंतु गुण्यागोविंदाचे व प्रेमाचे संबंध ते निर्माण करीत होते. आपल्या खानदेशांत पहा ना ! अंमळनेरला संत सखाराम महाराजांचा जेव्हां रथ निघतो, त्या वेळेस रथाला पहिली मोगरी देण्याचा पहिला मान मुसलमानभाईंचा आहे. आणि त्यांना आधीं नारळ देण्यांत येतो. जळगांव जवळच्या कानळदेगांवीं मुसलमानभाई पंढरपूरला दिंडी चालली कीं आपल्या मशिदीजवळ मुद्दाम थांबवून भजन करण्यास सांगत. अशी पध्दत होती. राम व रहीम एकरूप आहेत याचा अनुभव ते घेत.

मुसलमानांचा निराकार देव व हिंदूंचा साकार देव दोन्ही एकच आहेत हें पूर्वज ओळखण्यास शिकले होते.

पूर्वजांची ही थोर दृष्टि घेऊन आपण पुढें जाऊं या. थोर बाबर बादशहानें हिंदुस्थानांत मुसलमानांस सुखानें रहावयाचें असेल तर गायीला मारूं नये असें लिहिलें आहे. गाय आपल्याला दूध देते. तिचे बैल शेतीला मिळतात. मुसलमान शेतकरी लाखों, हिंदुस्थानांत आहेत. गाय मारण्यांत का धर्म आहे ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel