त्या तुरुंगांत राजकीय कैदी खूप जमले. जागा पुरेना. कांहीं क्रिमिनल कैदी सोडावे व कांहीं राजकीय कैदी दुसर्या मोठ्या तुरुंगांत पाठवावें असें ठरूं लागलें. राजकीय कैद्यांचे नंबर घेतले जाऊं लागले. विसापूर जेलमध्यें १०० कैदी पाठवावयाचे ठरलें. त्यांत रामदासाचेंहि नांव होतें. रामदास जाणार. रहिमूला वाईट वाटलें. त्या तुरुंगांतील दु:खांत तो एक त्याचा आधार होता. वाळवंटांत तो झरा होता. अंधारांतील तो दीप होता. पुन्हां रहिमूला आधार, पुन्हां रहिमू निराधार. सायंकाळी राजकीय कैद्यांची पार्टी जावयाची होती. दुपारीं रहिमू रामदासाला भेटला व म्हणाला, 'रामदास, बेटा तुला मी काय देऊं ? या रहिमूजवळ ही एक माळ आहे. ही माझी जपमाळ आहे. रात्रींच्या वेळचा माझा आधार म्हणजे ही माळ तुला मी देतों. ही घेऊन जा. ही माझी आठवण.' रामदासाला नाहीं म्हणवेना. परन्तु ही माळ कोठून आली असें अधिकार्यांनीं विचारलें तर ? रहिमूवर आणखीच रागावतील. रामदासानें रहिमूची समजूत घातली. रहिमू म्हणाला, 'रामदास, तुला पाहिलें म्हणजे मला माझ्या मुलाची आठवण होते. पुत्रप्रेमाचा अनुभव तुझ्या द्वारां मी घेत होतों. तूं माझे कपडे धूत होतास. मला वाटे मी पिता झालों. मला पुत्र मिळाला. तुला गुळाचा लाडू मी देत होतों. म्हणून ते अश्रु डोळयांत येत. तूं जाणार ? पुन्हां रहिमूला कोण ?' रामदास म्हणाला, 'कदाचित् सुटणार्या क्रिमिनलमध्यें तुझा नंबर येईल.' रहिमू म्हणाला, 'तें माझें नशीव नाहीं. तुरुंगच माझें घर, तुरुंगच कबर. जा रामदास, आठवण ठेव. सुटलास तर मला भेटावयाला ये. तीन महिन्यांनीं भेट घेतां येते. परन्तु मला कोण भेटायला येणार ? तूं ये.' रामदासनें कबूल केलें.
पार्टी विसापूरला गेली. रामदासला रहिमूची नेहमीं आठवण येई. कांहीं क्रिमिनल कैदी सोडण्यांत आले. परंतु रहिमूची पाळी त्यांत आली नाहीं. रहिमू अधिकच निराश झाला. त्याच्यानें खाववेना. तो आपला भत्ता घेई परंतु दोन घांस खाई. रहिमूला काय होत होतें ? त्याचें दु:ख कोणाला कळणार ?
म.गांधींची चळवळ थांबली. सारे राजकीय कैदी सुटले. रामदास बाहेर आला. रहिमूची भेट घेण्यास तो उत्सुक होता. रहिमूसाठीं साबणाच्या वड्या त्यानें घेतल्या क्रिमिनल कैद्यांना फार तर साबण बाहेरचा घेऊं देत. दुसरें कांहीं घेतां येत नसे.
रामदास त्या पहिल्या जेलमध्यें आला. जेलर साहेबांस भेटला. 'रहिमूला भेटावयाचें आहे' तो म्हणाला. त्याचा कैदी नंबर त्यानें सांगितला. जमादारसाहेब जवळच होते. ते म्हणाले 'तो रहिमू तर मर गया. बुढ्ढा हो गया था. बडा बदमाश.' जेलरसाहेब म्हणाले, 'सुपरिंटेंडेंट साहेबांनीं ती त्या दिवशीं लाथ मारली तोच ना कैदी ? काम करायच्या वेळेस माळ जपत बसला होता, ढोंगी, तो मेला. पुरला गेला.'
रामदास गंभीरपणें उठला. त्या साबणाच्या वड्या तो तेथेंच विसरला. जमादारसाहेबांनीं त्या काळजीपूर्वक उचलून घेतल्या. रामदास घरीं आला. त्यानें घरीं आल्यावर कोणत्या तारखेस रहिमू मेला त्याची माहिती विचारली. तारीख महिना कळविण्यांत आला. दरवर्षी ती तारीख व तो महिना आला म्हणजे रामदास उपवास करतो व रहिमूचें स्मरणाश्रूंनीं तर्पण करतो. त्या दिवशीं तो गरीब लोकांना कपडे, धान्य देतो.
१३ मार्च, १९३९.