८. पक्षी उडाला !
पुण्याला राहणे माझ्या जिवावर येत होते. पंख असते तर कोठे तरी उडून गेलो असतो, हरण असतो तर कोठे तरी पळून गेलो असतो असे मनात येई. लहानपणापासून मला पक्षी फार आवडतात, वाटे मी पक्षी असतो तर किती छान झाले असते ! निळया निळया आकाशात उडालो असतो, हिरव्या हिरव्या घरात राहिलो असतो. वा-यावर डोललो असतो. गोडगोड फळे खाल्ली असती. पाखरे फार सुखी असतील असे मला वाटत असे. उडणे हा आत्म्याचा धर्म आहे आणि उडू न देणे हा या मातीच्या देहाचा धर्म आहे.
बायकांचा एक साधारण स्वभाव आहे की, सासरच्या माणसांची निंदा करणे. पतीव्यतिरिक्त इतर माणसांचा त्यांना का म्हणून आपलेपणा वाटावा? त्यांचा त्यात दोष असतो असे नाही. हा मनुष्यस्वभावच आहे. माहेरच्या प्रेमळ माणसांची स्तुती व सासरच्या माणसांची निंदा हे सहजच ठरलेले असते. मी शाळेत जात नसे. घरीच असे. दुपारच्या वेळेस जेवणे-खाणे झाली, भांडी खरकटी झाली की, वाडयातील बायकांचे अड्डे बसत व निंदा स्तुती चालू होई. साहजिकच माझ्या कानांवर त्या गोष्टी पडत. मला वाईट वाटे. स्वत:बद्दल वाईट म्हटलेले कोणाला आवडेल ? मामांच्यावर आम्हा दोघा भावांचा बराचसा भार होता. शिवाय माझी मागे आलेली मावशी, तिलाही मामा हिंगणे येथे शिकवीत होते. मामीला अर्थात हे सारे कसे सहन होईल ? आणि कोणाला म्हणून का सहन व्हावे ? मामीचे निरनिराळे शब्द माझ्या मानावर पडून पडून तेथे रहाणे माझ्या जिवावर येऊ लागले. का आपला यांच्यावर भार घाला, असे मनात येई. परंतु मी जाणार तरी कोठे ? या विशाल जगात मी कोठे जाऊ ? या सहानुभूतिशून्य संसारात मी कोठे जाऊ ? कोणाकडे पाहू ?
मनातील या विचारांना आणखी एका गोष्टीने चालना मिळाली. माझ्या वडिलांना कोकणात स्वदेशीच्या खटल्यात सहा महिने शिक्षा झाली, असे मी केसरीत वाचले. मामांकडे केसरी येत असे. माझे वडील तुरुंगात गेले. तुरुंगात त्यांचे कसे होईल, असे माझ्या मनात येई. त्यांचे हाल होतील असे वाटे. तुरुंगासंबंधीच्या अनेक गोष्टी प्रचलित झाल्या होत्या. फटके मारतात, सुया टोचतात, तुरुंग म्हणजे नरकच असे सांगतात.
माझे मन अस्वस्थ झाले. काय करावे समजेना. निदान पुण्याहून तरी कोठे जाऊ या, असे मी मनात ठरविले. मी दत्ताची रोज पूजा करीत असे. गुरुचरित्राची पोथीही रोजच्या पूजेस असे. त्या पोथीत दीड रुपया असे. त्या रुपायाचीही पूजा केली जात असे. एक रुपया एक अधेली. पूजा करताना हा पवित्र दीड रुपया मी काढून ठेविला. पूजा झाली. जेवणे झाली. दादा शाळेत जावयास निघाला, 'श्याम, शब्द पाठ कर. विटीदांडू खेळू नकोस' असे तो म्हणाला. परंतु माझे डोळे पाण्याने भरुन आले. मी पळून जाणार होतो. शाळेतून आल्यावर मी घरी नाही असे कळल्यावर दादाला किती वाईट वाटेल, हे माझे मनात आले. 'असा रडतोस काय श्याम ? अरे अभ्यास नको का करायला ? आपले भाऊ तर तुरुंगात आहेत. अशा वेळेस तू नीट वागले पाहिजेस. पूस डोळे. मी जातो.' असे म्हणून मला उगी करुन दादा निघून गेला.