माझे मित्र मग माझ्यावर कां रागावतात ? मी कांग्रेसमध्यें त्यांच्यापेक्षां अधिक अर्थ पाहतों म्हणून ते मजवर रागावतात. दे. भ. अण्णासाहेब दास्ताने एकदां हंसत मला प्रेमानें म्हणाले, 'तुमची विशाल सहानुभूति आमच्याजवळ नाहीं.' मी जरा संकुचित व्हावें अशी माझ्या मित्रांची अपेक्षा दिसते. परंतु संकुचित वातावरणांत माझा आत्मा तडफडून गुदमरून मरेल. संकुचितपणामुळें का कांग्रेसची शक्ति वाढेल ? त्यांना तसें वाटत असेल, मला तसें वाटत नाहीं. कांग्रेसची शक्ति कमी होत आहे असें मला वाटलें तर मी माझा मार्ग सोडीन. कांग्रेस हें माझें महान् दैवत आहे. कांग्रेसचें बळ यत्किंचितहि कमी होण्यासाठीं मी कारणीभूत होत असेन तर वसिष्ठ ऋषिप्रमाणें---

"अद्या मुरीय यदि या तुधानोस्मि'
असेंच मीहि म्हणेन. मी असा चांडाळ असेन तर आजच मला मरण येवो.
मी कांग्रेसमध्यें अधिक अर्थ पाहतों. मी कम्युनिस्ट बंधूंशीं सहकार्य करतों. किसानसंघाशींहि तुसडेपणानें वागत नाहीं. परंतु याच माझ्या वृत्तीचा माझ्या मित्रांना राग येतो. कम्युनिस्ट व किसान कार्यकर्ते यांना मी अराष्ट्रीय मानावयास तयार नाहीं. हे लोक जात्यंध नाहींत. अत्यंत पददलित बंधूंसाठीं ते तडफडतात, रागानें बोलतात. ते शूर आहेत, त्यागी आहेत, कष्टाळू आहेत. उद्यां कांग्रेसचा सत्याग्रह सुरू झाला तर हे आधीं होमांत उड्या घालतील. स्वामी सहजानंदजींनीं अंमळनेरला हीच गोष्ट सांगितली. हे लोक कांग्रेसचे शत्रु नाहींत. अंमळनेरच्या कामगार परिषदेंतील ठराव वाचणार्‍यांस ही गोष्ट दिसून येईल. प्रत्येक ठरावांत कांग्रेसची शक्ति वाढवण्याबद्दल अट्टाहास आहे. 'कांग्रेसनें शिस्तभंगाचे इलाज योजले तरी रागावूं नका. किसान संघ काढलेत तरी ते कांग्रेसशीं जोडलेले ठेवा. कांग्रेसचे सभासद सर्वांनीं व्हा.' अशा गोष्टी त्या ठरावांत आहेत.

कांग्रेसला या लोकांना क्रांतिमय करावयाची आहे. क्रांतिमय म्हणजे हिंसामय नव्हे. क्रांतिमय म्हणजे सर्वांत मोठा गरीब वर्ग जो किसान-कामगारांचा त्यांच्या सुखाच्या गोष्टी काँग्रेसनें अधिक त्वरेनें हातीं घेणें. यायोगें हे वर्ग कांग्रेसच्या झेंड्याखालीं येतील. आम जनता कांग्रेसमध्यें आली म्हणजे कांग्रेसचें बळ शतपटीने वाढेल.

किसान कामगार कम्युनिष्ट कार्यकर्त्यांना आज कांग्रेस जवळ करूं पहात आहे. पं.जवाहिरलाल आल्यापासून हे वारे वाहूं लागले आहेत. कम्युनिस्ट बंधूंनीं महात्माजींची मोकळेपणें भेट घेऊन चर्चा केली. महात्माजी या शूरांना दूर नाहीं लोटूं पहात. असें कळतें कीं हल्लीं कम्युनिस्ट लोक व कांग्रेसमधील थोर सूत्रचालक यांच्यांत कांहीं वाटाघाटी होत आहेत. कदाचित् मुंबई कार्पोरेशनच्या निवडणुकींत कम्युनिस्ट लोक कांग्रेसच्या तिकीटावर उभे केले जातील. संभव आहे कीं मुंबई प्रां. कां. कमिटी मुंबईच्या कामगार कार्यकर्त्यांवरील शिस्तभंगाचे इलाज मागें घेईल. मग महाराष्ट्र प्रां. कां. कमिटीहि इकडे क्षमा करील. दृष्टि मोठी होत जाईल, कांग्रेसमध्यें अधिक अर्थ येईल.

म्हणजे मला नम्रपणें म्हणावेंसें वाटतें कीं कांग्रेस पत्राचें धोरण आहे तेंच कांग्रेसच्या थोर लोकांच्या मनांतील वृत्तीचें द्योतक आहे. कां. लाहि बंधनें हवींत, परन्तु तीं क्षुद्र बंधनें नकोत. पृथ्वीला क्षितिजाचें बंधन शोभतें. सागराला वेळेचे बंधन शोभतें. त्यांना क्षुद्र बंधन घालाल तर हास्यास्पद. चोहोंकडून कोंडलेलें थडगें नाहीं करावयाचें काँग्रेसचें. कांग्रेसमाता म्हणजे विशाल दृष्टीची, व्यापक सहानुभूतीची, सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ अशी संस्था.

ठिकठिकाणच्या कांग्रेस कार्यकर्त्यांनीं किसान कामगार कार्यकर्ते जवळ करावे. त्यांना आस्था दाखवावी. आज जनतेंत प्रचंड जागृति करावयाची आहे. सारी शक्ति उपयोगांत आणूं या. कम्युनिस्ट कांग्रेसद्रोही नाहींत. काँग्रेसला तेहि वाढवूं पाहतात. क्वचित् प्रखर मतभेद झाला तर तो प्रासंगिक असतो. क्षणभर आई मुलाला दूर लोटते व मूल आईपासून दूर जातें. पुन्हां दोघे एकमेकांकडे अश्रूंतून हंसत बघतात व एकमेकांस भेटतात.
९ जानेवारी, १९३९.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel