राष्ट्राला कमीपणा नका आणूं
निर्मळपूर मोठें गांव होतें. चांगलें म्हणजे त्यांतल्या त्यांत बरें. ज्या गांवांत प्रामाणिक लोक भरपूर असतील, दिल्या वचनाला जागतील, सत्याची पूजा करतील, तें गांव म्हणजे देवाचें गांव. ज्या गांवांतील लोक स्वच्छता सांभाळतील, सार्वजनिक कामांत अफरातफर करणार नाहींत, पैला शिवणार नाहींत, स्वार्थ दूर ठेवतील, वशिलेबाजी गाडतील, तें गांव म्हणजे देवाचें गांव. ज्या गांवातील लोक स्वदेशी ओळखतात, देशाला स्मरतात, देशाला काळिमा आणणारें कोणतेंहि कृत्य करीत नाहींत तें गांव म्हणजे देवाचें गांव. परन्तु अशीं गांवें कितीशीं या हिंदुस्थानांत असतील ? निर्मळपूरहि त्याच मामल्याचें. परन्तु म्हणतात ना दगडापेक्षां वीट मऊ. त्याप्रमाणें इतर गावांपेक्षां निर्मळपूर जरा बरें इतकेंच.
हिंदुस्थानांत कोणत्या पंचायतीचा कारभार, कोणत्या म्युनिसिपालटीचा कारभार आदर्शभूत आहे ? सारें जीवन जसें मातीमोल झालें आहे. सर्वत्र खाबू लोक. आपल्या या नालायक कारभारामुळें हिंदुस्थानची मान खालीं होते याची या प्रतिनिधींना जाणीवच नसते. स्वार्थापुढें त्यांना देश दिसत नाहीं. वशिल्याच्या लोकांच्या घरपट्टया कमी लावतील, स्वत:च्या घरपट्टया वेळेवर भरणार नाहींत, पैसे घेऊन काँट्रॅक्टें देतील, एक का दोन, सतराशें लफडीं. आमचें निर्मळपूरहि त्याला अपवाद नव्हतें.
परन्तु देशांत जरा राष्ट्रीय जागृति झाली होती. काँग्रेसचें वजन जरा वाढलें होतें. ती तुरुंगाचा रस्ता सोडून सरकारच्या खुर्चीवर जाऊन बसली होती. सरकारदरबारीं कांग्रेसचें सनदशीर वजन वाढलेलें पाहून पुष्कळ लोक कांग्रेसला भजूं लागले. जे पूर्वी तिचें नांव काढतांच शिव्या देत, ते तिचे गोडवे गाऊं लागले होते. सत्ता व स्वार्थ याशिवाय जगांत काय आहे ?
ठिकठिकाणीं लोक पंचायतीचा, बोर्डाचा, म्युनिसिपालटीचा, असेंब्लीचा कारभार नीट चालावा म्हणून काँग्रेसमार्फत निवडणुकी लढवूं लागले. फारशी आर्थिक सत्ता हातीं नसली तरी स्वार्थ दूर करूं, वशिलेबाजी नाहींशी करूं, प्रामाणिकपणें कारभार हाकूं, पैशाची अफरातफर होऊं देणार नाही असें काँग्रेस कार्यकर्त्यांस वाटूं लागलें. उमेदवारांची निवडानिवड होऊं लागली. त्यांनीं प्रतिज्ञापत्रकें लिहून दिली. नेहमीं खादी वापरूं, काँग्रेस सांगेल तसें वागूं असें लिहून दिलें. निवडणुकीचा प्रचार सुरू झाला. ठायीं ठायीं काँग्रेसला बहुमत मिळालें.
निर्मळपूरमध्यें सुध्दा काँग्रेसनें म्युनिसिपल निवडणूक लढविली. काँग्रेसला बहुमत मिळालें. अभिनंदनाच्या सभा झाल्या. सुताचे हार घालण्यांत आले. त्या निर्मळ सुतानें काँग्रेसच्या निर्मळ आत्म्याशीं यशस्वी वीर जोडले गेले. आनंदी आनंद झाला. परन्तु पुढें प्रश्न उभे राहूं लागले. अध्यक्ष कोण, चेअरमन कोण यांच्या भानगडी उपस्थित झाल्या. निर्मळपूरचा कारभार निर्मळपणें व निस्पृहपणें चालवूं व त्याचा लौकिक वाढवूं असें मनांत येण्याऐवजीं खुर्ची कोणाला मिळते याचीच चिंता वाटूं लागली. कार्यकर्त्यांस वाईट वाटूं लागलें. आपण यांच्यासाठीं घसे फोडले, मनांत आशा बाळगल्या परन्तु सारें का फुकट जाणार ? परन्तु कांहीं प्रतिनिधींच्या त्यागानें, सौजन्यानें वेळ सांवरली गेली, तात्पुरते प्रश्न सुटले. पुढें कारभार सुरू झाला.
काँग्रेसचा कारभार म्हणून लोक डोळयांत तेल घालून बघत होते. कोठें छिद्र सांपडतें, कोठें दोष सांपडतो, हें पाहण्यासाठी लोक टपले होते. कोणी सांगत. 'तुमच्या प्रतिनिधींच्या अंगावरची खादी आतां कोठें गेली ? अजून खादी अंगावर नाहीं. पांढरी टोपी डोक्यावर नाहीं, खादीचें धोतर कमरेला नाहीं.' ऐकून वाईट वाटे. परन्तु दिल्या शब्दाला जागतील, दिल्या कराराला पाळतील अशी आशा वाटे.
परन्तु पुढें तर आणखीच वाईट गोष्टी कानावर येऊं लागल्या. काँग्रेस पक्षाचेच लोक म्यु.टींत नाना प्रकार करूं लागले. निर्मळपुरांतील काँग्रेस कार्यकर्ते वातावरण निर्मळ राहण्याची खटपट करीत होते. कोणी म्हणाले, 'हे काँग्रेसचे नाहींत असें जाहीर करावें. काँग्रेसची मान्यता काढून घ्यावी. झेंड्याचा अपमान नको.' कोणी म्हणाले 'अधीर होऊन चालणार नाहीं. पाहूं, आशा धरूं' परन्तु कुत्र्याचीं शेपटें का सरळ होतील ? कडु कार्ली का गोड होतील ? कालपर्यंत ज्यांची एक विशेष वृत्ति होती, ती कां एका दिवसांत नाहींशी होईल ? अनेक वर्षांच्या संवई, अनेक वर्षे मनांत खेळविलेले स्वार्थ. ते का काँग्रेसच्या झेंड्याखालीं येतांच मरतील ?