निवेदन
राष्ट्रीय सप्ताहाचा आजचा पहिला दिवस. आज हिंदुस्थानभर प्रभातकाळीं सर्वत्र प्रभातफेर्‍या निघाल्या असतील. स्वातंत्र्याच्या गीतांनीं उगवणार्‍या सूर्याचें स्वागत केलें असेल. आज हिंदुस्थानच्या वातावरणांत राष्ट्रप्रेम भरून राहिलें असेल. स्वातंत्र्याची उत्कटता तीव्रतेनें भासूं लागली असेल. आजचा स्फूर्ति देणारा दिवस आहे. अशा या पवित्र व तेजस्वी दिवशीं हें नवीन साप्ताहिक मी सुरू करीत आहें.

१९३१ सालीं गांधी-आयर्विन करारामुळें सुटल्यापासून खानदेशमध्यें एखादें साप्ताहिक चालवावें असें माझ्या मित्रांजवळ मी शतदां बोललों असेन. अनेक वेळां चर्चा होत. आमचे वादविवाद होत. परंतु प्रत्यक्ष सृष्टींत कांहींच येत नसे. मध्यंतरीं धुळें येथें निघणार्‍या 'भारत' पत्रांत मी कधीं थोडें लिहीत असें. परंतु मी संपूर्णपणे स्वतंत्रच असणें श्रेयस्कर असें मला हळुहळू वाटूं लागलें. वर्तमानपत्र सुरू केलें पाहिजे ही भावना एखादे वेळेस माझ्या मनांत इतकी तीव्र होई कीं मी रात्रभर बसून साप्ताहिक लिहून काढीत असें व उष:काळीं स्वत:च्याच हृदयाशीं तें धरून बसत असें !

संयुक्त खानदेशमध्यें गेला महिना कामगारांचा झगडा चालला आहे. परंतु या झगड्याची वाच्यता इतर वर्तमानपत्रांत फारशी दिसत नाहीं. पगार न घेतां हजारों कामगार पोट बांधून शांतपणें कामें करीत होते. परंतु त्याची दाद-फिर्याद फारशी कोठें आली नाहीं; कामगारांची बाजू तेजस्वीपणें कोणीं मांडली नाहीं. काँग्रेसची प्रतिष्ठा खानदेशांत धोक्यांत आहे असें रणशिंग कोणी फुंकलें नाहीं. ही वस्तुस्थिति पाहून मनांतल्या मनांत मी जळफळत होतों. त्या जळफळींतूनच हें 'काँग्रेस' साप्ताहिक बाहेर येत आहे.

प्रत्येक जिल्ह्याला राष्ट्रीय विचारांचें एक तरी साप्ताहिक आहेच आहे. हा पूर्व खानदेश जिल्हाच दुर्दैवी होता. सर्व जिल्ह्यांत हा जिल्हा मोठा. अकरा तालुके व दोन पेटे एवढा ह्याचा विस्तार. एवढ्या जिल्ह्याला एकहि सच्चें राष्ट्रीय पत्र नसावें ही दु:खाची गोष्ट होती. काँग्रेसला संपूर्णपणें वाढविणारें पत्र पूर्व खानदेशांत नाहीं याची प्रखर जाणीव मला कित्येक वर्षांपासून आहे. ही उणीव अंशत: भरून काढावी म्हणून मी आज नम्रपणें परंतु निश्चयानें उभा राहिलों आहें. हें पत्र मी एकदम सुरू करीत आहें. कोणाला विचारलें नाहीं, पुसलें नाहीं. कारण विचारपूस करूं लागेन तर आज सात वर्षे बसावें लागलें तसें आणखी दहा वर्षें स्वस्थ बसावें लागेल. आतां चर्चा न करितां अर्चा सुरू झाली पाहिजे असें मनांत आलें. माझ्या मनाच्या समाधानासाठीं मी आरंभ करण्याचें ठरविलें आणि हा अंक बाहेर पडत आहे.

मजजवळ पैसा अडका नाहीं. दुसरा अंक कसा निघेल याची मला विवंचना आहे. परंतु मी आरंभ करीत आहें. मी माझें हें पत्रक भिक्षेवर चालविणार आहें. जी तूट येत जाईल ती भिक्षेंतून शक्य तों भरून काढावयाची. भिक्षेवर चालणारें हें पहिलें पत्र आहे. या पत्राला इतर कोणाचा न मिळाला तरी समर्थांचा तरी थोर आशीर्वाद मला मिळाल्याशिवाय राहणार नाहीं. मी व माझे मित्र निरनिराळ्या ठिकाणीं झोळ्या फिरवूं व हें पत्र चालवूं. भिक्षेकर्‍याचें पत्र मरत नसतें. कारण त्याला अनंत हातांचा नारायण देत असतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel