प्रश्न :- यांत वर्णाश्रमधर्माचा नाश नाहीं का ?
उत्तर :- खरें सांगूं का, वर्णाश्रमधर्म हा शब्द आज उरला आहे. कोठें आहे वर्ण व कोठें आहे आश्रम ? वर्ण म्हणजे काय ? ज्यानें त्यानें आपलें काम करणें. परंतु ब्राह्मणाचा मुलगा आज डेअरी घालतो, दुकान घालतो, फुलें विकतो, हॉटेल घालतो. कोठें आहे वर्ण ? क्षत्रियाचा मुलगा शिक्षक होतो, डॉक्टर होतो, कारकून होतो. वैश्याचा मुलगा वकील होतो, नाटकांत जातो, सिनेमांत काम करतो. परंतु वर्ण याची अधिक चिकित्सा करूं. वर्ण म्हणजे रंग. बुध्दीचा कोणता रंग घेऊन मनुष्य जन्माला आला आहे, हें ओळखणें म्हणजे वर्ण ओळखणें. आईबापांच्या अंगाचा रंग मुलाच्या देहाला असतो. परन्तु आईबापांच्या हृदयाचे, बुध्दीचे गुण मुलांत असतातच असें नाहीं. तसें असतें तर सारीं मुलें एकाच गुणधर्माचीं निपजलीं असतीं. परन्तु एकाच आईबापाचीं मुलें कोणी गणिती, तर कोणी चित्रकार, तर कोणी नकला करणारीं अशीं निपजतात. याचा अर्थ हा कीं प्रत्येकाचा विशिष्ट वर्ण आहे. त्या विशिष्ट वर्णाचा विकास त्यानें करावा व समाजाची सेवा त्यानें करावी. शाळांतून मुलांच्या या गुणांची परीक्षा झाली पाहिजे व त्या गुणांच्या विकासाची सोय राष्ट्रीय सरकारनें केली पाहिजे. जोंपर्यंत सर्वांना शिक्षण नाहीं, शिक्षणाचे प्रयोग करून मुलांचे गुणधर्म पारखले जात नाहींत, गुणधर्म पारखून त्यांच्या वाढीची सोय केली जात नाहीं तोंपर्यंत कोठला वर्ण ? सारे शूद्र आहेत. स्वराज्य मिळाल्याविना व खर्या शाळांतून प्रयोग झाल्याशिवाय वर्णचिकित्सा होणार नाहीं. ती चिकित्सा होऊन त्या त्या मुलांच्या विकासाची सोय स्वराज्याशिवाय कशी होणार ? आज सारे होतात कारकून, होतात मास्तर. आवड असो वा नसो. आज देवानें दिलेल्या गुणधर्मांचा वध होत आहे. देवानें दिलेलें बुध्दीच्या गुणांचें भांडवल गुलामगिरींत वाढीस न लागतां मरतें. देवानें जर विचारलें, 'मी तुला गुण दिले होते, त्याचा काय उपयोग केलास ?' तर मी काय उत्तर देणार ? 'देवा गुलामगिरीमुळें मला त्या गुणांचा कोंडमारा करावा लागला' असेंच म्हणावें लागेल. जर पुन्हां प्रभूनें विचारलें, 'मग त्या गुलामगिरीला दूर करावयास उठलास का' 'नाहीं' उत्तर द्यावें लागेल. मग प्रभु म्हणेल, 'तूं वर्णाचा अभिमान बाळगीत होतास. परन्तु मी दिलेला वर्ण मातींत दवडलास. दास्य दूर करावयास उठला नाहींस. तुझा सारा दंभ आहे.' स्वराज्याशिवाय खर्या वर्णाची चिकित्सा व विकास शक्य नाहीं. आज वर्ण नाहीं व आश्रमहि नाहीं. समाजांत बाळपणीं लग्नें करून नाचणार्यांना ब्रह्मचर्याची काय थोरवी ? मरेपर्यंत पोरें पैदा करणार्यांस वानप्रस्थ व संन्यास काय कळे ? आज समाजांत वानप्रस्थ असते तर साक्षरताप्रसार चुटकीसरशी झाला असता. परन्तु पेन्शनें खात शहरांतून बंगले बांधून राहतात आणि वर्णाश्रम धर्माच्या बेटे बाता मारतात ! चीड येते आज. महात्माजींनीं आश्रमधर्माला थोडा उजळा दिला आहे. आणि एकप्रकारें थोडा वर्णधर्मालाहि उजळा दिला आहे. विणकराला म्हणतात तूं वीण; तेल्याला म्हणतात तूं घाणा घाल. परंतु गिरणीचें तेल वापरणारे आम्हीं तेल्यांची जात मारीत आहोंत. गिरणीचें कापड वापरून विणकर, लोढारी, रंगारी सारे मारीत आहोंत. सर्वांत मोठा सब गोलंकार यंत्र करीत आहे. कारखान्यांत सारे एकत्र काम करतात. सर्वांचे धंदे कारखानदारांनीं मारले. आणि सर्वांना एकत्र घाणींत व नरकासारख्या चाळींत कोंडलें. अशा शेटजींवर वर्णाश्रमवाल्यांनीं आधीं बहिष्कार घालावा; अशा कारखान्यांतील मालावर बहिष्कार घालावा. सारे धंदे तुम्ही मारीत आहांत व सबगोलंकार वाढवीत आहांत. विचार कराल तर तुमचें हिडीस स्वरूप अधिकच उघड होईल. आज वर्ण नाहीं, आश्रम नाहीं, निरनिराळ्या जातींना धंदा नाहीं. परन्तु कांग्रेस धंदे देत आहे. ग्रामोद्योगसंघ, चरकासंघ, चर्मालयें, वगैरे सुरू करून धंदे देत आहे. आणि कोणी सेवेचा कोणताहि धंदा करो, तो पवित्र आहे, त्या माणसाला माणुसकीनें वागवा, असें शिव्याशाप खाऊन शिकवीत आहे. किती तुम्हांला सांगूं ?
प्रश्न :- तुमच्यामुळें हरिजन जरा ताठ मान करून चालूं लागले. हें बरें का ?
उत्तर :- पडलेल्यांची मान जरा सावरूं लागली तर खर्या भावाला आनंद होईल. आईला आपल्या लेकराची मान सदैव वांकलेली आवडेल का ? आज आपणांस ताठ उभें रहावयासच शिकावयाचें आहे.