रामभक्तीचा अर्थ
शुक्रवारीं रामनवमी झाली. सर्व हिंदुस्थानभर त्या दिवशीं रामनामाचा जयजयकार झाला. गांवोगांवीं, शहरोशहरीं रामजन्म साजरे करण्यांत आले. रामा हो, रामा हो, या निनादांनीं आकाश दुमदुमून गेलें. रामनवमी झाली. परंतु रामनवमीचा अर्थ कळला का ? रामनवमी आपण कां पाळतों ? रामाची जयंति कां साजरी करतों ? त्यांतील रहस्य काय, हेतु काय ?
रामाला आपण अवतार मानतों. अवतार म्हणजे काय ? अवतार म्हणजे खालीं उतरणें. जो स्वत:चे सुख-भोग सोडून, स्वत:चे माड्यामहाल सोडून, स्वत:चें सारें वैभव सोडून, स्वत:चा अहंकार व श्रेष्ठपणा सोडून, बहुजन समाजांत मिसळण्यासाठीं खालीं येतो, तो अवतार. श्रीरामचंद्रांनीं राज्य सोडलें. वरचा हिंदुस्थान सोडला. वैभव सोडून दडपलेल्या वानरांसाठीं ते धांवून आले. रामचंद्र वरून खालीं आले. रावणाची सुलतानशाही धुळींत मिळविण्यासाठीं खालीं उतरले. रावणाच्या कैदखान्यांत कोट्यवधी लोक गुलाम होऊन पडले होते. त्यांना मुक्त करण्यासाठीं राम धांवला. राम अवतारी पुरुष कां ? राम पददलितांची बाजू घ्यावयास आपलें सारें वैभव सोडून आला म्हणून. त्यानें तुच्छ वानरांना प्रेमानें छातीशीं लावून, त्यांच्यांतील दिव्यता प्रकट करण्यास अवसर दिला म्हणून. जी जी व्यक्ति आपलें महोच्चस्थान सोडून दीनदुबळयांसाठीं उभी राहाते, तिला अवतार म्हणतात.
भगवान बुध्दांनी स्वत:चें समृध्द राज्य सोडलें; जनतेंतील भ्रामक धर्म जावेत म्हणून त्यांनीं सारें, जीवन दिलें. पंडितांची संस्कृत भाषा टाकून लोकांच्या भाषेंत ते बोलूं लागले. महायागादिकांचे धर्म फेंकून परस्परांवर प्रेम करा, एकमेकांस साहाय्य करा, असें त्यांनीं सांगितलें. सर्व खालच्या समाजांत ते उतरले व त्यांना वर नेण्यासाठीं झटले. म्हणून बुध्दांना आपण अवतार मानतों.
कृष्णाला अवतार कां मानतों ? नंद राजाचा मुलगा असूनहि हातीं काठी व खांद्यावर कांबळा घेऊन तो गायी चारावयास जाई. सर्व गुराख्यांत मिसळे. त्यांच्या बरोबर खेळे, खाई पिई. श्रीकृष्णांना कोणतेंहि कर्म कमी वाटत नसे. स्त्रियांचें शेण लावण्याचें काम करावयास कृष्ण तयार, अर्जुनाचा रथ हांकावयास तयार; घोड्यांचा खरारा करावयास तयार ! ज्यांना ज्यांना वरचे वर्ग तुच्छ मानतात, त्या सर्व श्रमजीवी स्त्रीपुरुषांची बाजू घेऊन कृष्ण उभा राही. आपला खोटा मोठेपणा सोडून बहुजनसमाजांत तो मिसळला, म्हणून तो अवतार.
गंगेला आकाशांत राहण्यास मौज वाटत नव्हती, येथें सूर्य चन्द्र तारे होते. परंतु खालीं पृथ्वीवर ओसाड प्रदेश पाहून, लोक भुकेले पाहून ती गंगा आकाशांतून खालीं उतरली. भगीरथानें प्रार्थना केली 'हे गंगे, तेथें आकाशांत राहून काय करतेस ? येथें लाखों शेतकरी शेती पिकत नाहीं, पाणी मिळत नाहीं, म्हणून तडफडत आहेत. तुला वर वैभवात राहवतें कसें ? आपलें वैभव घेऊन खालीं ये. तुझ्या वैभवाचा पूर किसानांचीं शेतें समृध्द करण्यांत खर्च होऊं दे.' गंगामाईनें ऐकलें. ती आकाशांतून खालीं आली. गंगेचा अवतार झाला.
अवतार या शब्दांतील महान् अर्थ आपल्या कधींच ध्यानांत येत नाहीं. आपण अवतारांचे उत्सव करतों. परंतु त्या अवतारी व्यक्ति, त्या महान् व्यक्ति बहुजनसमाजासाठीं, तिरस्कृतांसाठीं, पददलितांसाठीं, दीनदुबळयांसाठीं उभ्या राहिल्या हें आपण विसरतों. शिवाजी महाराजांचा अवतार म्हणून त्यांची जयंति साजरी करूं. परंतु शिवाजी महाराज सर्व इनामदार जहागिरदारांस दूर करून मावळयांसाठीं, शेतकर्यांसाठीं मरावयास उभे होते हें आपण विसरूं. 'प्रजेनें लावलेल्या झाडास हात लावूं नका.' असे आज्ञापत्र काढणार्या श्रीशिवाजी महाराजांच्या चरित्रांतील अर्थ किती संस्थानिकांना, राजे महाराजांना, सरदार दरकदारांना, सावकार कारखानदारांना कळतो ? छत्रपतींचे उत्सव सारे करितात व गरिबांना छळतात. रामाची जयंति करितात आणि बहुजनसमाजाला तुच्छ मानतात. कृष्णजयंति करितात आणि शेतकर्यांना कुणबट्टे म्हणतात. अवतारांचा अर्थ कोणालाहि कळत नाहीं.