“तुला आळवीत                  बैसल्यें होत्यें दादा
काय वयनीच्या नादा                    गुंतलासी ॥”

“वयनीने मोहिनी घातली म्हणून बहिणीला विसरलास ना ? बरे पण खुशाल आहेस ना, सारी मंडळी बरी आहेत ना ? थकलास हो दादा. तू का आजारी होतास ? डोळे का असे खोल ?' किती प्रश्न ती करते. परंतु प्रेमळ भाऊ म्हणतो :

प्रवासाचा शीण                  ताई नाहीं मी आजारी
हळुवार चित्त भारी                        ताई तुझें ॥
ताईला पाहून                    हरेल सारा शीण
भावाला बहीण                           अमृताची ॥
ताईला पाहून                   सारीं दु:खें हरपती
हृदयी भरती                              प्रेमपूर ॥

किती दिसांनी भाऊ भाऊबीजेसाठी आलेला. बहीण मग थाट करते. परंतु ती गरीब असते. तिच्या घरात गहू नसतात. ती शेजी बाईकडे जाते :

“शेजारणी बाई                 उसने द्यावे गहूं
पाहुणे आले भाऊ                      फारा दिशीं ॥”

शेजारीण नाही म्हणत नाही. सुंदर मोत्यासारखे गहू शेजी देते. बहीण दळते :

सोनसळें गहूं                   रवा येतो दाणेदार
फेण्यांचे जेवणार                     भाईराजा ॥
सोनसळे गहूं                  त्यांत तुपाचे मोहन
भाऊबीजेचें जेवण                   भाईरायाला ॥

घरात चंदनाचे पाट आणून ती मांडते. भावासाठी काय करू, काय न करू असे तिला होते :

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel