यशोदा कृष्णाला खेळवते, जेवविते, तो तिच्या निर्‍या धरून उभा राहतो. चांदोबा खेळायला मागतो :

यशोदेच्या निर्‍या         कृष्ण धरूनि उभा राही
चंद्रमा म्हणे देई             खेळावया

कृष्ण वाढतो. यमुनेच्या तीरी गाई चारतो. कालियाला मारण्यासाठी यमुनेत उडी घेतो. ते झोकदार वर्णन वाचा :

कृष्ण उडी टाकी         कळंब कडाडला
शेष दणाणला                 पाताळांत
कृष्ण उडी टाकी         कळंबाच्या मेजें
यमुने पाणी तुझे             गढूळले

उंच कळंबाच्या झाडावरून कृष्ण उडी मारतो. त्यामुळे कृष्ण खोल जातो. यमुनेच्या तळाचा गाळ वर येतो.
असा हा गोपाळकृष्ण भक्तांची संकटे दूर करतो. गायीसाठी पावा वाजवतो. साध्या मोरपिसांनी नटतो :

खांदीये घोंगडी             अधरी धरी पांवा
गोपाळ कृष्ण गावा             गोकुळींचा
मोरमुकुट माथां             गळा वनमाळा
स्मरावा सांवळा                 गोकुळीचा

कृष्ण खोड्या करतो. यशोदा त्याला बांधते, मारते. ज्याच्या नावाने बध्द मुक्त होतात, त्याला यशोदा बांधून ठेविते :

ज्याच्या नांवें होती         संसारांत मुक्त
यशोदा बांधीत                 त्याला दावें

जो दुष्ट असुरांना मारतो, त्याला यशोदा काठी मारते :

राक्षस संहारी             कालिया विदारी
यशोदा त्याला मारी             वेताटीने

असा हा गोड विरोधाभास आहे.

आणि ती कुंजवनातील फुललेल्या शारदीय चांदण्यातील रासक्रीडा :

कां ग सखी तुझे         डोळे लाल धुंद
काननीं गोविंद                 वाजवितो

सूचक उत्तर ! काननातील वेणुध्वनी ऐकून झोप कशी येणार ?

कृष्ण भगवान् पांडवांचा सखा. द्रौपदीचा तो पाठीराखा. राजसूय यज्ञात वाढताना द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटली. पापी हसू लागले. परंतु कृष्णाने लाज राखली. द्रौपदी चतुर्भुज झाली :

दोन हाती वाढी             दोन हाती बांधी
सांवळी द्रौपदी                 मांडवात
राजसूय यज्ञी             द्रौपदीचे तुटे बिरडे
चतुर्भुज कीं गोविंदे             तिला केलें   

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel