“पोथी सोडी” म्हणजे पोथी सोडून जातो, पोथी गुंडाळतो. पदांची म्हणजे वेदांची. वेदातील ऋचांमधील प्रत्येक शब्द संधी सोडून निराळा म्हणणे, या गोष्टीला “पदापर्यंत म्हणणे” असे म्हणतात. अमक्या भटजीने पदापर्यंत म्हटले आहे असा प्रयोग करतात.

समुद्र म्हणजे अमर्याद काव्य ! बायकांनी त्याचे वर्णन केले आहे. समुद्राचे पाणी सारखे नाचते. त्याला क्षणाची विश्रांती नाही.

समुद्राच्या पाण्या         स्वस्थता अणू नाहीं
नाचतें हालते                 सदा खालीं वर होई

समुद्र कधी आटत नाही. कारण तो सर्व प्रवाहांना जवळ घेतो, जो सर्वांना जवळ घेईल तो अमर होईल :

कोठलेहि असो             पाणी समुद्र घे पोटी
उन्हाळा पावसाळा             त्याला नाही कधी तुटी

समुद्र सारखा ओरडत असतो ! त्याचे काय हरवले आहे ? काय आहे त्याची वेदना ? त्याचा एकुलता एक गोरागोमटा मुलगा चंद्र दूर जाऊन बसला म्हणून समुद्र ओरडतो:

समुद्रा रे बापा             किती टाहो तूं फोडशी
पुत्र तुझा गोरा गोरा             जाऊन बसला आकाशीं

अशा या समुद्राच्या लाटा सारख्या उसळत असतात. शुभ्र फेस वर येत असतो. हा फेस नाही. समुद्र आपल्या मुलग्याला, त्या चंद्राला, जणू फूले अर्पण करतो :

समुद्राच्या लाटा         फेस उधळीती
गोड त्या चंद्राला             जणूं फुलें अर्पिताती

ही एक काव्यमय उत्प्रेक्षा पाहा :

समुद्रा ग मध्यें             लाटांचें उभें शेत
फेसाचें पीक येत             अपरंपार

समुद्राचे वर्णन, त्याप्रमाणेच पावसाळ्यात दुथडी भरून जाणार्‍या नद्यांचे वर्णन. कृष्णेचे हे वर्णन वाचा :

भरली कृष्णाबाई         जशा दुधाच्या उकळया
जटा ठेविल्या मोकळ्या             दत्तात्रेयांनी

कृष्णेच्या त्या फेसाळ लाटा म्हणजे दुधाला फुटलेल्या जणू उकळ्या ! किंवा दत्तात्रेयाच्या या मोकळ्या सोडलेल्या जटा ! औदुम्बर किंवा नरसोबाची वाडी येथील का हे वर्णन आहे ? बहुधा नरसोबाच्या वाडीचे असावे. कारण तेथे खडक आहेत व फेसाळ लाटा कृष्णापंचगंगेच्या संगमात उसळत असतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel