उषाताईचा नवरा आला रे घाटीशी
भाईराया दिवटीशी तेल घाली १४१
उषाताईचा नवरा आला रे घाटीये
भरूं हें पाठीये तेलफळ १४२
वाजत गाजत बाळ गृहस्थाचे आलें
दारांत ओवाळीलें वधू मायें १४३
तोरणाच्या दारा कशाचे रुसणें
चीर मागतें दुसरे अक्काबाई १४४
तोरणाच्या दारा चिखल कां झाली
वरुमाय न्हाली वयनीबाई १४५
बाशिंगाची कळी लागते तोरणा
नवरा मुलगा शहाणा गोपूबाळ १४६
बाशिंगाची कळी लागली अनंता
नवरा मुलगा नेणता गोपूबाळ १४७
पिवळे नेसली पिवळे तिचे पाय
मुलाची वरुमाय शांताबाई १४८
नवर्या मुलाची करवली कोण
नेसली सूर्यपान शांताबाई १४९
चला जाऊं पाहूं मधुपर्क सोहळयाला
कंठी देतो जावयाला भाईराया १५०
मधुपर्की एक बैसलासे हिरा
तो तुझा नवरा उषाताई १५१
मधुपर्की एक बैसलासे मोती
तो तुझा लक्ष्मीपती उषाताई १५२
वाजत गाजत येऊ दे उभ्या बिदी
माळ घेऊन आहे उभी उषाताई १५३
वाजत गाजत आले गृहस्थाचे बाळ
ऊठ सखे माळ घाल उषाताई १५४
वाजत गाजत बाळ गृहस्थांचे आले
हाती धरून त्याला नेले बाप्पाजींनी १५५
वाजंत्री वाजती चला जाऊ पहायला
वस्त्र देतो जावयाला अप्पाराया १५६
लगनाच्या वेळे भट करिती सावधान
होतसे कन्यादान उषाताईचें १५७
नेस ग अक्काबाई हिरवे पाचूचें
कन्यादान ग लेकीचे उषाताईचे १५८
पांचा ग पेडी वेणी मामांनी उकलीली
कन्यादाना उभी केली उषाताई १५९
कन्यादान करुनी पुण्य आहे भारी
हाता आहे झारी बाप्पाजींच्या १६०