आता मुलगा आठ वर्षांचा झाला. त्याची मुंज होते. मुहूर्त पाहतात. मुंजीची बोलावणी जातात :

नदीपलीकडे            हिरव्या शालूच्या दोघीजणी
मुंजीची बोलावणी            गोपूबाळाच्या ॥
मला हौस मोठी            सोन्याच्या जानव्याची
मुंज करा तान्हेयाची            गोपूबाळाची ॥
मुंजीचा मुहूर्त            मामा पुसतो जोश्याला
चंद्रबळ भाचेयाला            गोपूबाळाला ॥

मुंज झाल्यावर भिक्षावळ होते :

पहिली भिक्षावळ            मामा मावशींची
तुझ्या आजोळींची            गोपूबाळ ॥

मग तो ब्रह्मचारी भिक्षा मागतो :

एका हाती दंड            दुजा हाती झोळी
भिक्षा मागे ब्रह्मचारी            गोपूबाळ ॥

आणि भटजी शिकवायला येतो. पंतोजीचीच ती तर्‍हा :

गायत्रीचा मंत्र            भटजी पढवीतो
बाळाला रडवीतो                दोन्हीं वेळां ॥

कधी कधी बाळाची मुंज पाचवे वर्षीच करीत. कारण त्याचे लग्न लवकर करण्याची इच्छा:

पाचा वरुषांचा            मुंजीची काय घाई
वाटते सून यावी                मायबाईला ॥

अशा ह्या लहान मुलाला ब्राह्मण संध्या तरी कशी शिकवणार ? भटजी त्याला कडेवर घेऊन संध्या शिकवतात:

पांचा वरुषांचा            मुंजा आहे लहान
कडे घेऊन ब्राह्मण            संध्या सांगे ॥

हळूहळू बाळाला संध्येची गोडी लागते:

माझ्या अंगणात            चांदीची कावड
संध्येची आवड                तान्हेबाळा ॥

मुलाच्या लग्नाची तयारी होऊ लागते. शाळेत जाऊन त्याचे अक्षर बघत :

मुली सांगू येती            शाळेसी जाऊनी
तुझे अक्षर पाहुनी            गोपूबाळा ॥

अशी लहानपणीच लग्ने होत. जिच्याजवळ लग्न लागायचे त्या मुलीचे वर्णन, लग्नाचे सोहळे, रीती, ते सारे पुढील प्रकरणी. या प्रकरणात वात्सल्यरस लुटा. मातृप्रेमाच्या सागरात डुंबा व कृतार्थ व्हा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel