परंतु मुंबई नवीन चालीरीतीचे होते. सुधारणा येतात:

मुंबई मुंबई             सारी मुंबई रांगडी
केरव्यावांचून                 कोणी भरेना बांगडी

सार्‍या बायकांना केरवा हातात हवा; परंतु आज केरवाही मागासला. आता रेशमी बांगडी हवी. आणि मुंबईच्या नळांवरची ही टीका ऐका. कोकणात लांब असलेल्या विहिरीवरून ज्यांना पाणी आणावे लागते अशा बायकांनी ही ओवी रचिली असावी:

मुंबईच्या बायका         आहेत आळशी
नळ नेले चुलीपाशीं             इंग्रजांनी

इंग्रजांच्या कर्तृत्वाचे हे वर्णन आहे:

मुंबई शहरांत             घरोघरीं नळ
पाण्याचे केले खेळ             इंग्रजांनी

बडोदे शहराच्या काही गमतीदार ओव्या मिळाल्या. कोणत्याही शहरात नवीन रचना करावयाची असली म्हणजे पाडापाड करावी लागते; जुनी घरे पाडावी लागतात. नवीन रस्ते करावे लागतात; लोकांना नुकसानभरपाई दिली तरी ते असंतुष्ट असतात. आणि बायकांना तर जुने घरदार जाणे म्हणजेच फार वाईट वाटते. इतकी वर्षे सांभाळलेले नष्ट व्हावे याचा त्यांना राग येतो. बडोदे शहरात सुंदर प्रशस्त रस्ते आहेत; परंतु कोणी तरी बाई कुरकूर करते;

बडोदे शहरांत             पाडीले जुने वाडे
मोठया ग रस्त्यांसाठी             नवे लोक झाले वेडे
राणीच्या हातींचा         राजा झाला ग पोपट
वाडे पाडून बडोद्या             रस्ते केले ग सपाट

परंतु काहींनी अशी कुरकूर केली, तर काहींना या गोष्टीचा अभिमान वाटतो:

बडोदे वाढले             रस्ते नि इमारती
डोळे दिपवीती                 पाहणारांचे

या ओवीत जरा उपहासही आहे का ? बडोदे वाढले; रस्ते नि सुंदर इमारती वाढल्या; परंतु माणसांची मने वाढली का ? मोठया रस्त्यावरून हिंडणारांची, मोठे रस्ते करणारांची मने मोठी झाली का ? एक बाई म्हणते, 'हो'

सयाजीराव महाराज         बडोद्याचे धनी
राज्यकर्ते अभिमानी             जनतेचे

जनतेचा अभिमान धरणारे श्री सयाजीराव आहेत:

बडोदे शहरांत             वडांची थंड छाया
प्रजेवर करती माया             सयाजीराव

वटवृक्षाच्या शीतळ छायेप्रमाणे महाराज प्रजेवर छाया करतात असे वर्णन आहे.

अनेक तीर्थक्षेत्रांचे एकेका ओवीत वर्णन आहे. आणखीही ओव्या असतील; परंतु मला थोडयाशा मिळाल्या. कोकणाचे हे वर्णन ऐका:

समुद्राच्या कांठी         कोंकण वसलें
कृष्ण-अर्जुन बैसले             रथावरी
समुद्राच्या कांठी         कोंकण वसले
सुखाने हासले                 नारळीत

नारळी-पोफळीच्या छायेत सुखाने हसत आहे. आणि समुद्रातले व डोंगरावरचे ते पहारा करणारे किल्ले:

कोकणपट्टी             रत्‍नागिरीचा जिल्हा
जळी स्थळीं किल्ला             पहारा करी

आणि मुंबई व अलिबाग यांच्यामध्ये आलेल्या खांदेरी-उंदेरीचे हे वर्णन:

खांदेरी उंदेरी             या दोघी जावा जावा
मध्ये ग कुलाबा             हवा घेई

अशी ही वर्णन आहेत. अशा शेकडो ओव्या असतील. परंतु त्यांचा संग्रह कोण करणार ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel