हंस रे राजसा हंसशी किती गोड
देई आनंदाची जोड माउलीला ३०१
मामाराया भाचा कडे घेतसे हिर्याला
हात घातला तुर्याला तान्हेबाळाने ३०२
पुरे आतां रडें डोळे झाले लाल लाल
मामा देईल रुमाल पुसावया ३०३
पुरे आता रडे आतां दाखव हंसून
मामा आलासे दुरून तुझ्यासाठी ३०४
पुरे आता रडे ठेवील मामा नावें
मामाने प्रेमे घ्यावें भाचेयाला ३०५
घे रे घे रे मामा जरा भाच्याला खेळव
त्याला वासरे दाखव गोठयांतील ३०६
घे रे घे रे मामा तुझ्या भाच्याला हिंडव
त्याला दाखव मांडव तोंडलीचा ३०७
घे रे घे रे मामा तुझा भाचा छंदकर
दाखव झाडांवर पांखरांना ३०८
आवडत्या मामाराया आवडत्या भाच्या घेई
गोडसा पापा घेई आनंदाने ३०९
मामेया भाचेया कौतुके नाचव
वानर दाखव हुपूप करी ३१०
घे रे घे रे मामा छंदी भाच्याला डोलव
हिरवा राघूं तूं बोलव पिंजर्यात ३११
घे रे घे रे मामा आवडता तुझा भाचा
कोण लळा पुरवी त्याचा तुझ्यावीण ३१२
मामाने घेतला आश्चर्य हो झालें
उभे की राहीले तान्हे बाळ ३१३
काय जादू केली मामा राया सांगे
हंसू कसें लागे तान्हेबाळ ३१४
मामा तो मातुल आईची बरोबरी
म्हणून कडेवरी हांसे बाळ ३१५
एक जसा एक कृष्णनाथ देवकीचा
तसा हा तान्हेबाळ आहे हो माउलीचा ३१६
आई म्हणे बाळा नको रे खाऊं बोरें
खाती मायें सारी पोरे बाळ म्हणे ३१७
आई म्हणे बाळा नको खाऊं रे चिंचा गडया
पाणी सुटे माझ्या तोंडा माऊलीये ३१८
आई म्हणे बाळा नको खाऊं रे आवळे
खाती ग सगळी बाळे माउलीये ३१९
बासशी सारखा तान्हेबाळा चुलीपाशी
आवडे ना मशी खरोखरी ३२०