भाईराया श्रीमंत. त्याला देसाईचे वतन आहे. त्याला ऊन सहन होत नाही. लहान मुले उन्हाच्या झळा लागून कोमेजतात :

दुपारचे ऊन             झळा झळाळा लागती
बाळें माझी कोमेजती             सुकुमार

अशा दुपारच्या उन्हातून एखादे वेळेस आईला कोणाकडे जायचे असते, तिच्या पायांत जोडा वगैरे नसतो. कडेवर मूल असते. भरभर तर चालवत नाही:

दुपारचें ऊन             पाय ग भाजती
त्यांत बाळ कडेवरती             माऊलीच्या

दुपारच्या वेळेला आई मुलांना जरा झोपविते. पाखरेही झाडांच्या गर्द छायेत शांत बसतात :

दुपारचें ऊन             पांखरें शांत शांत
आईच्या मांडीवरी             तान्हे बाळ ग निवांत

कधी कधी उन्हाळा इतका प्रखर होतो, की बाहेर तोंड काढवत नाही. जणू निखार्‍यांची वृष्टी होत आहे असे वाटते.

दुपारचें ऊन             बाहेर बघवेना
बाहेर निघवेना                 घडीभर
दुपारचें ऊन             जणू इंगळांची वृष्टि
हिरवी सारी सृष्टि             जळून गेली

परंतु या उन्हाळ्यातच झाडांना नवीन पालवी फुटते. वसंत ऋतू येतो. मोठे आश्चर्य आहे !

कडक उन्हाळा             रानांत नाही पाणी
देव आश्चर्य करीतो             झाडां पल्लव फोडूनी
आंबे मोहरले             आनंद कोकिळेला
वसंताच्या स्वागताला             करीतसे

अशी ही वर्णने आहेत. सकाळच्या सूर्यनारायणाचे वर्णनही मनोहर आहे. रथावर बसून सूर्य येतो. सर्वत्र प्रकाश पसरतो :

छत्र धरी शिरी             त्याचा लखलखाट पडे
सूर्यनाथ चढे                 रथावरी

आणि एक भगिनी प्रेमाने म्हणते, सूर्यनारायण आधी माझ्या दारात उगवले व मग पृथ्वीवर त्यांचा उजेड पडला :

उगवले सूर्यदेव             आधी उगवे माझ्या दारी
मग पृथ्वीवर                 उजेड पडे

उजाडत सूर्य लाल लाल असतो. जणू शेंदराचा गोळा :

उगवला भानु             शेंदराचा थप्पा
आयुष्य मागे बाप्पा             गोपूबाळ

सोनेरी किरणांचा मुकुट घालून सूर्य येतो. तो येताच सार्‍या चराचरात चैतन्य संचरते :

सूर्य उगवला             किरीट किरणांचा
पांखरा फुटे वाचा             झाडांवरी

बहीण सूर्यनारायणाला म्हणते, “देवा, फार तापू नकोस. भाऊ बाहेर गेला आहे. तो सुकुमार आहे.”

सूर्यनारायणा             तापू नको फार
बाहेर सुकुमार                 भाईराया

सूर्य मावळतो. विद्यार्थी पुस्तके बांधतात. गुरूला प्रणाम करून जातात :

कविता संप्रूर्ण झाल्या         पदांची पोथी सोडी
गुरूला हात जोडी             भाईराया

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel