लक्ष्मी उगीच नाही आली. बाळ शेतात काम करतो, गोफण घेऊन पाखरे हाकलतो. तिने “अरे शेती करणार्‍या” अशी बाळाला हाक मारली :

लक्षुमीबाई आली         शेताचा बांध चढे
हाती गोफण पाया पडे             गोपूबाळा ॥
लक्षुमी की आली         शेताच्या बांधावरी
“शेत्या म्हणून हाका मारी         माझ्या बाळा ॥

भाग्यदेवता कोणाचा हात धरावा म्हणून बाजारात हिंडत होती. परंतु माझा बाळच तिला आवडला :

लक्षुमी चंचळ             हिंडते बाजार
धरिते पदर                 गोपूबाळाचा ॥

असे हे धनधान्यसंपन्न घर. आल्यागेल्याचाही नीट पाहुणचार तेथे होतो. कृपणपणा नाही. सूनबाई अतिथ-अभ्यागताचे मनापासून करते. कुळाची कीर्ती वाढविते :

वाटेवरलें घर             आल्या गेल्या गूळपाणी
वडिलांची सून शहाणी             उषाताई ॥
वाटेवरलें घर             आल्या गेल्याचें माहेर
मिळे मीठ ग भाकर             सर्व लोकां ॥

अशा सूनबाईला कोठे ठेवू कोठे न ठेवू असे सासर्‍याला होते. किती काम करतेस तू असे तो म्हणतो :

लक्षुमी लक्षुमी             हांका मारीतो सासरा
तुझ्या कामाचा पसारा             वैनीबाई ॥
मामंजी म्हणती         धन्य ग सूनबाई
कुळाला कळा येई             तुझ्यामुळें ॥

सासुसासरे, सासरची सर्व माणसे चांगली मिळाली, म्हणून सून म्हणते :

काय मी पुण्य केलें         बहीणीसारखी नणंद
कमळी गोविंद                 पूजीयेला ॥
काय मी पुण्य केलें         भावासारखा हो दीर
कमळीं रघुवीर                 पूजीयेला ॥

पुण्य पदरी असल्याशिवाय थोडेच हे भाग्य मिळणार ? कृतज्ञतेने सूनबाई सासूसासर्‍यांस म्हणते :

मामंजी सासूबाई         तुम्ही तुळशीची झाड
आम्ही तुमच्या उजेडे             राज्य करूं ॥

तुमची पुण्यपरंपरा, तिच्या प्रकाशात आम्ही पावले टाकू :

पूर्वी लहानपणी लग्ने होत. पतीचे धाकटे भाऊ भावासारखेच वाटत. काही हवे असले तर दिरांजवळ सांगावयाचे. वैनीबाई भावोजीस म्हणते :

भावोजी हो दिरा         माझ्या मनींचे जाणावें
माझ्या वेणीतले आणावे         गंगावन ॥
भावोजी हो दिरा         माझ्या मनीचे एक करा
दारी बाग पेरा                 द्राक्षियांची ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel