नवरी पाहूं आले सोपा चढून अंगणी
नवरी शुक्राची चांदणी उषाताई ६१
नवरी पाहूं आले सोपा चढून माडी गेले
नवरी पाहून दंग झाले उषाताई ६२
नवरी पाहूं आले काय पाहतां नवरीस
माझी लाडकी ही लेक सोनें जणूं मोहरीस ६३
उषाताई ग नवरी पुतळीचें जणूं सोनें
जिची सून होईल तीनें पुण्य केले ६४
उषाताई ग नवरी कोणा भाग्यवंता द्यावी
हिर्याला जडवावी हिरकणी ६५
नवरा पाहूं गेले काय पाहतां वतनाला
मुलगी द्यावी रतनाला उषाताई ६६
मुलगा पाहूं येती काय पाहतां घरदार
मुलगा आहे वतनदार गोपूबाळ ६७
मुलगा पाहूं येती आक्काताई तुझ्या गुणा
लेकी तशा सुना वागवीशी ६८
मुलगा पाहूं येती हुंडा द्यावा पांचशाचा
नवरा मुलगा नवसाचा गोपूबाळ ६९
स्थळ पाहतांना नका बघूं घरदार
जोडा बघा मनोहर उषाताईला ७०
स्थळ पाहतांना नका पाहूं धनबीन
एका पाहावें निदान कुंकवाला ७१
स्थळ पाहतांना पहा गणगोत्र कूळ
मुलगी दिल्यावर काढूं नये कूळबिळ ७२
शेरभर सोनें गोठाभर गायी
तेथें आमची उषाताई देऊं करी ७३
ज्याच्या घरीं हत्ती घोडे ज्याच्या घरीं ग पालखी
तेथें देऊं ग लाडकी उषाताई ७४
ज्याच्या घरीं हत्ती घोडे ज्याच्या घरीं कुळंबिणी
तेथें देऊं हिरकणी उषाताई ७५
मुलीच्या रे बापा नकों भिऊ करणीला
घालूं तुमच्या हरणीला गोठतोडे ७६
मुलीच्या रे बापा हुंडा द्या पांच गाडया
शालूच्या पायघडया पाहिजेत ७७
लगनाच्या बोली बोलती पारावरीं
नवरा हुंडयाचा माझ्या घरीं गोपूबाळ ७८
गृहस्थ व्याहीया हुंडा दे पांच गायी
लेंकुरवाळा व्याही मामाराया ७९
गृहस्थ गृहस्थ विचार करिती बाजारीं
माझ्या बाप्पाजींच्या हुंडा शेल्याच्या पदरीं ८०