माझ्या दारावरून हरदासी मेळा गेला
त्यांत मी ओळखीला भाईराया १०१
हजाराचा घोडा बाजारांत उठे बसे
बहिणीचें घर पुसे भाईराया १०२
माझ्या दारावरून कोण गेला ग सुरंगी
हाती रुमाल पंचरंगी भाईराया १०३
अंबारीचा हत्ती रस्त्याने उठे बसे
माझा भाईराया बहिणीचें घर पुसे १०४
मुंबई शहरांत गल्लोगल्ली चिरे
त्यांतून सखा फिरे भाईराजा १०५
भाऊबीजेकारणें तुम्ही यावें भाई
संगे आणा वैनीबाई उषाताई १०६
माझ्या दारावरून टपालवाला येतो
माझ्या ग भाईरायाचे खुशालीचे पत्र देतो १०७
निरोप धाडित्यें निरोपासरशीं चिठ्ठी
सत्वर यावें भेटी भाईराया १०८
दळण मी दळी काढितें रवापीठी
धाडित्यें तुम्हां भेटी भाईराया १०९
निरोप धाडीत्यें निरोपासरसें यावें
भेटून मला जावे भाईराया ११०
वाईट हा रस्ता टाकी लावून फोडावा
छकडा रंगित पाठवावा भाईरायाला १११
नदीच्या पलीकडे कोणाचे शेले भाले
मातृभक्त माझे आले भाईराज ११२
चांदीच्या घंघाळांत चंद्र सूर्य डोले
सखा कचेरींत बोले भाईराया ११३
काशींतलें कागद आले डब्यांतून
वाचले सभेंतून भाईरायानें ११४
माझा आहे भाऊ शहाणा सुरता
त्याच्या लौकिकाची वार्ता चोहींकडे ११५
मोठमोठे डोळे हरीण पाडसाचे
तसे माझ्या राजसाचे भाईरायाचे ११६
गोड गोड बोले हंसणे किती गोड
जगत्रीं नाहीं जोड भाईरायाला ११७
हाताचा उदार तसा मनाचा खंबीर
गुणानें गंभीर भाईराया ११८
कुणा ना दुखवील हंसून हांसवील
सार्यांना सुखवील भाईराया ११९
माझा भाईराया सर्वांना हवा हवा
आहे मधुरेचा खवा भाईराया १२०