क्षुद्र लोक क्षुद्रांवर ओरडतात. परंतु मोठी माणसे मोठ्यांशी मुकाबला करतात. ही गोष्ट पुढील ओवीत किती सुंदर रीतीने मांडिली आहे पाहा :

कुतरा भुंकतो             मांजर देखून
गर्जतो पंचानन                 हत्तीसाठीं

तीर्थयात्रा वगैरे काय कामाच्या ? परमेश्वर जवळ हवा. स्वत:चे जीवनच तीर्थ केले पाहिजे. परमेश्वर शेवटी हृदयात हवा :

राम राम म्हणुनी         राम माझ्या हृदयात
जसें मोती करंड्यांत             वागवीतें

किती सुंदर ओवी ! रामाचा जप करून शेवटी जीवन राममय झाले पाहिजे. ध्येयाच्या चिंतनाने सारे जीवनच ध्येयमय झाले पाहिजे.

जगात जर मोठ्यांपुढे टुरटुर कराल तर फजिती होईल. आकाशातील नक्षत्रांनी चंद्र नसता चमकावे. परंतु चंद्र-प्रकाशांत ती लोपून जातील. पौर्णिमेला त्यांनी ऐट दाखवू नये. अवसेला त्यांचे राज्य :

चांदण्यांनो तुम्ही         अवसें राज्य करा
थोर नसतां गलबला             करावा की

पुरातील वांगी पुराणात असे आपण नेहमी म्हणतो, परंतु तीच गोष्ट या खाली दिलेल्या ओव्यांत किती ठसकेदार रीतीने सांगितली आहे. पहा :

पुराणींच्या गोष्टी         सखी पुराणी राहती
जन हे वागती                 यथातथा
पुराणीच्या गोष्टी         देवळांत गोड
संसाराची ओढ                 कोणासुटे

जगात अच्युत कोणी नाही. सर्वांना मरण आहे.

फुलें सुकतात             तारे गळतात
असे कोण ग अच्युत             संसारांत

स्त्रिया रोज सकाळी चूल सारवतात. आठवड्यातून एखादे वेळेस सारवून भागणार नाही. त्याप्रमाणे मनुष्याने साधनेला स्वीकारणे जरूर आहे. कधी रामनाम घेऊन काम भागणार नाही. कधी लहर आली म्हणजे खादी घेऊन जमणार नाही. ध्येयाचा निदिध्यास हवा तरच जीवनावर संस्कार होतो :

चूल सारवीती             जशी नित्य ग नेमानें
तसें मन हे भक्तीने             सारवावें

बाबर बादशहा म्हणत असे की, जगाच्या खानावळीत जो जो आला त्याला शेवटी मरणाचा पेला घ्यावा लागतो. शेवटी सर्वांना मरण. माउलीच्या पोटी आलेला प्रत्येक प्राणी शेवटी धरित्रीमायेच्या पोटी जायचा आहे. रेल्वेचे तिकिट संपले म्हणजे उतरावे लागते, त्याप्रमाणे आयुष्य सरताच जगाला रामराम करावा लागतो.

तिकिट संपता             सोडिली आगीनगाडी
सोडावे लागे जग             आयुष्याची सरता घडी

आगगाडी, मोटार यांच्या उपमा बायका देऊ लागल्या आहेत. मोटार सारखी पो पो करीत जाते, जणू अहंकाराने धावते. पावसात सर्वांच्या अंगावर खुशाल चिखलपाणी उडविते. मोटारीतील प्रतिष्ठिताला गोरगरिबांची किंमत नाही; ही गोष्ट स्त्रिया ओव्यांतून सांगत आहेत :

पों पों ग पों पों             मोटार पुढचें पाहीना
तसा कोणा जुमानीना                 अहंकार

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel