असे जरी असले तरी आईची इच्छा मुलगी चांगल्या घरात पडावी, दागदागिने अंगावर पडावे. गडी माणसे कामाला असावीत अशी असते :

शेरभर सोने             गोठाभर गाई
तेथे आमुची उषाताई             देऊ करा ॥
ज्याच्या घरी हत्ती घोडे         ज्याच्या घरी कुळंबिणी
तेथे देऊ हिरकणी             उषाताई ॥

नवरी मुलगी कशी आहे ऐका :

नवरी पाहूं आले         सोपा चढून आंगणी
नवरी शुक्राची चांदणी             उषाताई ॥
नवरी पाहूं आले         काय पाहतां नवरीस
माझी लाडकी ही लेक             सोने जणू मोहरीस ॥
नवरी पाहूं आले         सोपा चढून माडी गेले
नवरी पाहून दंग झाले             उषाताई ॥

नवरी पाहून झाल्यावर शेवटी हुंडयाच्या गोष्टी निघतातच :

मुलीच्या रे बापा         हुंडा द्या पांच गाडया
शालूच्या पायघडया             पाहिजेत ॥

परंतु एक श्रुतिस्मृतिशास्त्रज्ञ गृहस्थ म्हणतो :

गृहस्थ व्याहीया         हुंडा दे पांच गायी
लेकुरवाळा व्याही             मामाराया ॥

पाच गायीच नवरदेवाला द्या. मोठे घर आहे. मुलेबाळे आहेत. दूधदुभते होईल.

लग्न ठरते. तयारी होऊ लागते. घरात दळण पापड होऊ लागते :

जाते घडघडे             उडीदाच्या डाळी
पापडाचे दळी                 अक्काबाई ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel