तान्हेबाळाच्या रूपाचे वर्णन करता करता महाकाव्य जन्माला आले आहे. वामन पंडितांची स्वभावोक्ती येथे फिकी पडेल. ते पांडित्य मातेच्या वात्सल्यातून उत्पन्न झालेल्या प्रतिभेपुढे काळवंडेल. मुलाला नवीन दात आलेले असावेत. त्याला उपमा डाळिंबाच्या दाण्यांची आहे. लाल हिरडयांतून ते लहान पांढरे दात बाहेर येत असतात :

तान्हियाचे दांत            जसे डाळिंबाचे दाणे
खेळविते कौतुकाने            उषाताई ॥
तान्हियाचे दांत            जशी मोतियांची ओळी
हांसता पडे खळी                गोड गालीं ॥

परंतु या वर्णनापेक्षाही ही खालील ओवी पहा :

पेरा झाला रानांतून        मोड काढी वरी मान
तसे हंसे माझं तान्हं            पाळण्यांत ॥

शेतातून अंकुर नुकतेच वर येत असावेत, तसे बाळाचे नवीन चिमणे दात त्याच्या हसण्यातून प्रगट होतात, किती सहृदय व समर्पक दृष्टांत !

आणि मुलाच्या गालांचे वर्णन ऐका :

गोर्‍या गालांवर            लाल शोभतो मुलामा
गोड हंसशी गुलामा            तान्हे बाळा ॥
रुप्याच्या वाटींत            ठेवावे लाल फूल
तसे राजसाचे गाल            तान्हेयाचे ॥

किती सुंदर उत्प्रेक्षा ! तान्हे बाळाचे आणखी थोडे वर्णन वाचू या :

कुरळया केसांचा            विरळ दातांचा
लाडका आईचा                तान्हेबाळ ॥
मोठे मोठे डोळे            भिवया लांबरुंद
गाल गोरे लालबुंद            राजसाचे ॥
तान्हिया रे बाळा        गोड तुझी हनुवटी
गोंडस तुझ्या मुठी            नाचवीशी ॥

असे हे बाळ घरात वाढत असते. चंद्राच्या कोरेप्रमाणे वाढते :

चंद्राची वाढे कला        तसे बाळाचें बाळासें
लावण्या उणें नसे            अणुमात्र ॥

आई त्याला वाढवीत असते. त्याला न्हाऊमाखू घालीत असते. ही एक अमर ओवी वाचा :

माझे तान्हें बाळ            हळदीने न्हाई
त्याचें पाणी जाई            शेवंतीला ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel