मुलाच्या प्रेमासाठी माता आली. तिला का साप चावेल ? कधी गोठयात वाघ बसलेला असावा. तेथे मुलासाठी मातेला जावे लागते :

गायीच्या गोठयांत        वाघ हंबरला
शेष दणाणला                पाताळांत ॥

वाघाच्या डरकाळीने पाताळातला शेषही घाबरला. माउलीला ते गायीचे हंबरणेच वाटते. गायीच्या गोठयातील वाघ क्रूर वाटत नाही. बाळाच्या प्रेमाने रंगलेली तिची सारी सृष्टी.

हट्टी बाळाने नाना छंद घ्यावे. त्याची समजूत घालता घालता आईला पुरेसे होते.

छंदकर बाळ            छंदाला काय देऊं
नको असा हट्ट घेऊ            तान्हेबाळा ॥
छंदकर बाळ            छंद घेतलासे रात्री
चंद्रमा मागे हाती            खेळावया ॥

मुलगा खेळत असला म्हणजे मातेला आनंद असतो. परंतु तिन्हीसांजा झाल्या म्हणजे ती त्याला शोधू लागते. त्याला ती हाका मारते. त्याचा कमरेतल्या घागर्‍यांचा नाद ऐकते :

घागर्‍या घुळघुळ            दणाणला सोपा
खेळतो प्राणसखा                गोपूबाळ ॥
घागर्‍यांचा नाद            पडतो माझ्या कानी
खेळतो वृंदावनी                गोपूबाळ ॥

माजघर दणाणून सोडणारा बाळ बाहेर जातो. आई हाका मारून कानोसा घेते :

बाळ खेळूं जाई            वडासाउलीये
घरी माउलीये                साद घाली ॥

गायी गोठयात येऊन वासरांना चाटतात. पक्षी घरटयात जाऊन पिलांना भेटतात. परंतु आईचा बाळ कोठे आहे :

किती हांका मारू            उभी राहून दारात
चंद्र कोणाच्या वाडयात            गोपूबाळा ॥

दिवे लागले. वरती देवाचा चंद्र उगवला. परंतु माता म्हणते माझा चंद्र कोठे आहे ? शेवटी बाळ येतो. परंतु त्याला खेळणे पुरे वाटत नाही. आई म्हणते :

तिन्हीसांजा झाल्या        गुरांवासरांची वेळ
वाटेवेगळा तूं खेळ            गोपूबाळा ॥

खेडयात सायंकाळी पाहावे. गुरांची गर्दी असते. रानातून गायीगुरे परत येत असतात. म्हणून खेळायचेच असले तर वाटेत तरी खेळू नको असे आई सांगत आहे.

तान्हेबाळाच्या ओव्यांत सारी सृष्टी ओतलेली आहे. गाय व तिचे वासरू; माय आणि तिचे लेकरू. गायीच्या ओव्या किती गोड आहेत :

ये ग तूं ग गायी        चरून वरून
तान्हेबाळाला म्हणून            दूध पाजूं ॥
गायी ग चरती            कोंवळी कणीसें
तान्हेबाळाला नीरसे            दूध पाजूं ॥
गायी ग चरती            कोंवळा ग चारा
दुधाच्या चारी धारा            वासरांना ॥
गायीचा ग गोर्‍हा        मांडी वाळूनीया बसे
वाडा शोभीवंत दिसे            तान्हेबाळानें ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel