स्त्रियांची भव्य कल्पना, उच्च प्रतिभा तुम्हाला पाहावयाची आहे ? मुक्तेश्वरांची, किंवा इंग्रज कवी मिल्टन यांची भरारी तुम्हाला स्त्री-वाड्.मयांत पाहावयाची आहे ? ही पहा :
समुद्राच्या कांठी विष्णू वाळू मळी
घडवी बाहुली ब्रह्मदेव
या ओवीत प्रास-अनुप्रास आहे; आणि विशाल कल्पना. रोज प्राणिमात्र जन्माला येत आहेत, एखादा कुंभार एखाद्या नदीकाठी मडकी बनवितो. त्याला थोडीशी माती व थोडे पाणी पुरते. परंतु भगवान विष्णू समुद्राची न संपणारी वाळू मळतात. समुद्राचे पाणी वापरतात आणि मग त्या मळलेल्या वाळूची ब्रह्मदेव ही बाहुली बनवितो. बाहुली शब्द किती समर्पक आहे ?
ज्याने जीवनात वासना स्वैर सोडल्या, ज्याच्या जीवनात संयमाला स्थान नाही, ज्याने जीवनात विषयभोगाचे मळे पिकविणे सुरू केले, त्याच्या हातून पापाशिवाय काय होणार ? पापाचे कोठारच त्याच्या घरी जमा होते :
ज्याच्या दारी आहे कंदर्पाचें रोप
त्याच्या हाती सारे पाप जमा होतें
एखाद्या गर्विष्ठ बाईला एक नम्र व अनुभवी बाई म्हणते :
कोणाचें आहे कोण माझा आहे भगवान
शेवटा जाऊं दे मूर्खा तुझा अभिमान
माझा तर भगवान आहे. त्याचाच मला आधार. तू स्वत:च्या घमेंडीत असशील तर असा तुझा अभिमान होवो यशस्वी ! बघ यश मिळते का ! गर्वांचे घर तर खाली असते; परंतु तुझा गर्व जाणार असेल यशाच्या शिखराला तर जावो बापडा ! गीतेत म्हटले आहे की धर्माचे आचरण अल्पस्वल्पही हातून झाले तरी ते कामी येते. अंधारात एखादा किरणही तारतो, समुद्रात एखादा ओंडकाही जगवितो :
इवलीशी पणती प्रकाशा देतसे
इवलेंसें पुण्य जिवा आधार होतसे
आणि या जगांत निरुपयोगी अशी वस्तू नाही. उपयोग करून घेणारा मात्र हवा. बायका आपला नेहमीचा अनुभव सांगतात :
सुंठ घासायला खापरी येते कामी
जगांत रिकामी वस्तू नाही
कोकणांत तापात खूप घाम वगैरे एकदम येऊ लागला तर सुंठीचे कुडे कौलावर घासतात. ती जी मऊ पूड होते, ती अंगाला फासतात.