मैत्रिणी एकदा गेल्या म्हणजे कोठे सिंहस्थात, कन्यागतात किंवा आषाढी-कार्तिकीला यात्रेत भेटावयाच्या :

माझ्या ग मैत्रिणी         आहेत देशोदेशी
आषाढी एकादशी             भेटी झाल्या ॥

कोणी जाणारा येणारा असला तर मैत्रिणीला माझे दु:ख सांगू नका असे ती म्हणे :

जीवाला माझ्या जड         नका सांगूं एकाएकी
घाबरी होईल सखी             शांताबाई ॥

माझ्या रडकथा कशाला तिला सांगता ? सांगायच्याच झाल्या तर हळूहळू सांगा. ती फार कोवळया मनाची आहे. दूर पडलेल्या मैत्रिणीचे पत्र आले तर ती अर्धी भेटच जणू झाली :

दूरच्या देशीची             काळी रेघ आली
अर्धी भेट झाली             मैत्रिणीची ॥

पुष्कळ वर्षांनी जर कधी लहानपणच्या मैत्रिणी माहेरी भेटल्या तर किती आनंद ! त्या एकमेकींना म्हणतात :

तुझा माझा मैत्रपणा         मैत्रपणा काय देऊं
एका ताटी दोघी जेवूं             मनूबाई ॥
तुझा माझा मैत्रपणा         मैत्रपणा काय देऊं
एका घोटे पाणी पिऊं             मनूबाई ॥

मैत्रिणी मने मोकळी करतात. सासरची सुखदु:खे बोलतात. त्यांच्या त्या बोलण्याच्या वेळेस दुसरे तिसरे कोणी त्यांना नको असते. तो तटस्थ दिवाही नको वाटतो :

आपण गुज बोलूं         कशाला हवा दिवा
आहे चांदण्याची हवा             शांताबाई ॥

मैत्रिणीला ती म्हणते, “काय सांगू मी ? सगळीकडे तेच. पळसाला कोठे गेले तरी तीन पाने. आमच्या घरी कधी सुखाची, प्रेमाची पूर्णिमा, तर कधी दु:खाची भांडणाची अवस असते !”

कधी उजळे पुनव         कधी काळी ग अवस
मैत्रिणी काय सांगू             मिळे सुधा मिळे वीख ॥

संसार म्हणजे सुखदु:खांचे मिश्रण. अमृताचे व विषाचे पेले. घरात पती बरोबर कधी प्रेमाला रंग चढतो, तर कधी भांडण होऊन अबोले निर्माण होतात. मैत्रिणीला ती म्हणते, “आपण आधणाच्या पाण्यात भात शिजवितो. मी रागाने फणफणणार्‍या पतीच्या सहवासातही प्रेम समाधान पिकविते.”

आधणाचे पाणी             त्यांत भात शिजवीत्यें
रुसवे फुगवे                 त्यांत सुख पिकवीतें ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel