पाहून बहीण सारी दु:खे दुरावती
हृदयीं भरती प्रेमपुर ८१
दिवाळीच्या सणा दादा सासुरवाडी जावें
भाऊबीजे भाई यावे बहिणीकडे ८२
बहिणीचीं मुलें भाऊ खेळवूं लागला
जरी थकला भागला प्रवासानें ८३
शेजारिणी बाई उसने द्यावे गहू
पाहुणे आले भाऊ फारा दिशी ८४
शेजारिणी बाई उसनें द्यावें लोणी
भाऊ माझा ग पाहुणा त्याला शिरा मेजवानी ८५
जिरेसाळी गहूं खिरीला किती घेऊं
जेवणार माझे भाऊ पांचजण ८६
सोनसळे गहूं रवा येतो दाणेदार
फेण्यांचे जेवणार भाईराया ८७
सोनसळे गहूं त्यांत तुपाचे मोहन
भाऊबीजेचें जेवण भाईरायाला ८८
माझ्या घरीं पाहुणा भाजीभाकरीचा
जेवणार साखरेचा भाईराया ८९
चंदनाचे पाट मांडीले हारोहारीं
आज आहे माझ्या घरीं भाऊबीज ९०
भाऊबीज केली बहिणीनें काल
भाईराया हिरवी शाल पांघुरला ९१
भाऊबीज केली बहिणीनें रातोरातीं
भाईराये चंद्रज्योती उजळील्या ९२
भाऊबीजेच्या रे दिवशीं कां रे भाई रुसलासी
तुझा शेला माझ्यापाशी आठवण ९३
सोन्याची सांखळी देत्यें मी बजावून
तूं भाऊ मी बहीण भाईराया ९४
भाऊबीजेच्या दिवशीं करीन कवतूक
ओवाळीन पालखींत भाईराया ९५
भाऊबीज करूं आपण दोघीतिघी
शाल घेऊं मनाजोगी भाईरायाला ९६
भाऊबीजेच्या दिवशीं भाऊ बैसला न्हाऊन
चल सखे ओंवाळून ताईबाई ९७
भाऊबीजेच्या दिवशीं ओवाळीन तुला
जरीचा खण मला भाईराया ९८
भाऊबीजेच्या दिवशीं ओवाळीत जातें
ताटीं घाला मोत्यें भाईराया ९९
हात भरला कांकणानें कान भरला चाफानें
केलें माहेर भावानें बहिणीला १००