सावित्री सावित्री जरी म्हणतील ओठ
सौभाग्या नाही तूट भू-मंडळी ४१
सावित्री सावित्री जरी म्हणतील नारी
त्यांचे या संवसारी वज्रचुड ४२
सावित्री सावित्री म्हणती ज्या नारी
मंगळसूत्र दोरी अक्षै त्यांची ४३
सावित्रीचें व्रत करील जी नारी
जन्म सावित्री संसारी होईल ती ४४
सावित्रीचे व्रत करावें पवित्र
ऐकावें चरित्र सावित्रीचें ४५
यमधर्माला आडवी पतिव्रता किती मोठी
अपूर्व केल्या गोष्टी सावित्रीनें ४६
सावित्रीचा महिमा अमर भूमंडळी
अबला झाली बळी यमाहून ४७
सतीच्या प्रभावें काळहि मनी खचे
नाव घ्या सावित्रीचे संसारात ४८
रामाची ग सीता लक्ष्मणाची ग वयनी
दशरथाची पहिली जेष्ठ सून ४९
पांचा वरूषांचे राम अडचा वरुषींची सीता
धन्य तुझी दशरथा सून आली ५०
सीतेला सासुरवास कैकयीने केला
रामासारखा भ्रतार तिला नाही भोगू दिला ५१
अहिल्या शिळा धाली गौतमाची कांता
रामरायें वनीं जातां उध्दरली ५२
अहिल्या शिळा झाली पतीच्या श्रापानें
दशरथाच्या लेकानें उध्दरीली ५३
आश्चर्य आश्चर्य रामरायाच्या पायाचें
शिळेतून वर येई रूप अहिल्या सतीचें ५४
रामरायाच्या चरणाचा धूमीला ग लागे कण
अहिल्या ग प्रगटली न लागतां एक क्षण ५५
राम लक्षुमण भरत शत्रुघ्न
चौघांमध्ये कोण राज्य करी ५६
राम लक्षुमण गेले की काननांत
भरत मनांत दु:खी कष्टी ५७
रामसीता वनी माय कैकेयी पाठवी
मनी भरत आठवी नित्य त्यांना ५८
जटाधारी झाला निजतो सुखें भुई
भरत जणूं होई वनवासी ५९
नको म्हणे राज्य भरत कैकयीला
बंधू नाही असा झाला जगत्रयीं ६०