लक्षुमी की आली बैसली ती बाजे
माझें घर तिला साजे खरोखर ३४१
लक्षुमी कीं आली आली मागील दारानें
धाकट्या बाळानें बोलाविलें ३४२
लक्षुमी कीं आली बाळाच्या पायगुणा
भाईरायाच्या शांतपणा मानवली ३४३
लक्षुमी कीं आली हाती मोहरांचे ताट
पुशी कचेरीची वाट गोपूबाळाच्या ३४४
लक्षुमी कीं आली आलेली जाऊं नको
धरला पदर सोडूं नको गोपूबाळाचा ३४५
लक्षुमी कीं आली शेताच्या बांधावरी
शेत्या म्हणून हांका मारी गोपूबाळाला ३४६
वाटेवरलं शेत जशी हळद लोटली
कोठें लक्षुमी भेटली गोपूबाळा ३४७
वाटेवरलं शेत नको खुडूं त्याची पात
धनी आहे हो रागीट दादाराया ३४८
वाटेवरलं शेत नको मोडूं त्याची काडी
येते सावकारा गाडी गोपूबाळाला ३४९
वाटेवरला आंबा कोणी ओळंबीला
सखा सासुरवाडीला गेला गोपूबाळ ३५०
वाटेवरलं घर आल्या गेल्या गूळपाणी
वडीलांची सून शहाणी उषाताई ३५१
वाटेवरंल घर आल्या गेल्या ताकभात
वडीलांचे नांव राख गोपूबाळ ३५२
वाटेवरलं घर आल्या गेल्याचे माहेर
मिळे मीठ नी भाकर सर्व लोकां ३५३
भावोजी हो दिरा माझ्या मनींचे एक करा
दारी बाग पेरा द्राक्षीयांची ३५४
भावोजी हो दिरा सांगत होत्यें नानापरी
स्वस्त झाल्या राजापुरी चंद्रकळा ३५५
भावोजी दिरांनी आणिली केतकें
मी मागत्यें कौतुकें भावजयी ३५६
भावोजी हो दिरा माझ्या मनींचे सांगत्यें
तुमच्यापाशी मी मागत्यें कुडी जोड ३५७
भावोजी हो दिरा माझ्या मनींचे जाणावें
माझ्या वेणींतले आणावें गंगावन ३५८
काय मीं पुण्य केलें भावासारखा हो दीर
कमळीं रघुवीर पूजीयेला ३५९
काय मीं पुण्य केलें बहिणीसारखी नणंद
कमळीं गोविंद पूजीयेला ३६०