आनंदी ग बाई जशी कैकयी दुसरी
गिळलें ग राज्य जसें माणीक सूसरीं ४१
जळला बुधवारवाडा बाराच्या ठोक्याला
साहेब लोकाला वर्दी गेली ४२
जळला बुधवारवाडा उडालें कऊल
नेला पुण्याचा डऊल इंग्रजांनी ४३
चला जाऊं पाहूं पेशव्यांचा शनवारवाडा
दारांत चौघडा जेथें वाजे ४४
चला जाऊं पाहूं पुण्यांतले वाडे
जेथें लाखों घोडे नाचले ग ४५
पुणें शहरांत छपन्न सरदार
भरे ग दरबार पेशव्यांचा ४६
पुणें शहरांत मोठमोठे वाडे
लोक परी वेडे कारभारांत ४७
पुणें शहरांत केला पाण्याचा सुकाळ
परी पुण्याचा दुष्काळ चोहीकडे ४८
पुणें झाले सुनें गुणे झाले उणें
देवे नारायणें न्याय दिला ४९
पुणें झाले सुनें वाडे ओस पडे
वैभव सारे गेले मराठ्यांचे ५०
पुण्याचें वैभव पुन्हां दिसेल ठळक
तेथे आहेत टिळक देशभक्त ५१
पुण्याची पुण्याई पुन्हा ग उदेली
मूर्ति सांवळी जन्मली टिळकांची ५२
स्वदेशीचा मंत्र लोकमान्य देती
मिळेल त्यानें मुक्ति हिंदुस्थाना ५३
बायांनो नटूं नका परदेशी ग चिटानें
बुडती कारखाने साळियांचे ५४
विदेशी बांगडी नको भरूं ग हातांत
अन्नान्न देशांत हिंदुस्थानी ५५
चहाचे व्यसन दारूच्या बरोबरी
कपबशा घरोघरीं खुळखुळती ५६
चहाचें व्यसन कपबशा ग निघाल्या
प्रकृती क्षीण झाल्या घेणार्यांच्या ५७
माझे दारावरनं कोण गेले गरजत
जयजयकार ग करीत टिळकांचा ५८
टिळक सुटले रात्रीचे साडेबारा
देशोदेशी गेल्या तारा देशभक्तां ५९
टिळक सुटले रात्रीचे साडेअकरा
घरोघरी साखरा वांटीयेल्या ६०