व्रते, सण वगैरे : ओव्या
पहाटे उठूं फुलें आणूं पाटीभर
आज आहे मंगळागौर उषाताईची १
पहाटेच्या प्रहररात्री उठोनी फुलें आणूं
मंगळागौर सजवुनी ठेवायला २
प्राजक्तीच्या कळ्या करूं त्यांची अब्दागीर
आज आहे मंगळागौर उषाताईची ३
का ग सखी तुझें डोळे असे लाल
मंगळागौरीचें ग काल जागरण ४
वसोळ्या किती होत्या सखी तुझ्या घरी
होत्या मैत्रीणी ग चारी चुडेयांच्या ५
जागवूं मंगळागौर खेळ खेळू नानापरी
नवी नवरी माहेरी उषाताई ६
फुगडी खेळं ये तूं ग मी ग सखी
राहील ओळखी जन्मवेरी ७
फुगडी खेळूं ये फिरूं ये गरगर
दणाणेल घर बाप्पाजींचे ८
झिम्मा खेळू ये ग आपण मैत्रिणी जोडीच्या
आपण मैत्रिणी गोडीच्या बरोबरीच्या ९
दणदण फुगडी दणाणती सोपा
खेळतां सुटे खोपा मैत्रिणीचा १०
गरगरा नको फिरवू मला येते ग भोवंडी
पुरे कर ग फुगडी नको ओढूं ११
दणदण फुगडी दणाणे माजघर
जागवीती मंगळागौर उषाताईची १२
दंडाची दंडफुगडी तूं ग मी ग घालूं
माहेरी नाचूं-खेळू पोटभर १३
मोठ्या मोठ्या नारी फुगड्या खेळतात
प्रेमानें मिसळतात मुलींमध्ये १४
मोठ्या मोठ्या नारी ओखाणे प्रेमे घेती
पतीच्या नांवी प्रीती बायकांना १५
मोठ्या मोठ्या नारी गाणी म्हणती गमतीची
गाजते नवरीची मंगळागौर १६
श्रावणी सोमवार शिवालयी जाऊं
शिवामूठ वाहूं पाहूं शंकराला १७
श्रावणी सोमवार आज शेवटील
शंकराचा बेल भावे वाहूं १८
गोपद्मांचा नेम चातुर्मासी माझा
प्रसन्न कंथराजा माझ्यावरी १९
शाकाहार व्रत असे माझे बाई
नको देऊं भलतें कांही फराळाला २०