भरता भेटला भेटला हृदयाला
रामरायाने न्हाणीला नेत्रजळें १४१
भरताच्या पाठीवर राम फिरवितो हात
बारा वरसांचे कष्ट दूर केले १४२
बारा वरसांनी कौसल्या भेटे रामा
हृदयी दाटे प्रेमा माऊलीच्या १४३
कौसल्या माउली रामाला धरी पोटी
उमटेना शब्द ओठी कांही केल्या १४४
वाजंत्री वाजती वाजती माळावर
राज्य-अभिषेक कौसल्याच्या बाळावर १४५
वाजंत्री वाजती चला सख्यांनो पहायला
रामाची आरती जाते मारुतिरायाला १४६
राम-लक्षुमण अर्धांगी सीता नारी
सेवेशी ब्रह्मचारी मारुतिराय १४७
राम-लक्षुमण अर्धांगी सीता शोभे
सेवेशी दास उभे मारुतिराय १४८
सतरंज्यांना ठसे लोडांना आरसे
रामरायाच्या सभे बसे मारुतिराय १४९
सतरंज्यांना ठसे शोभती कमानी
रामरायाच्या दिवाणी मारुतिराय १५०
शिंदेशाई तोडे सिताबाईच्या हातांत
रामरायाच्या रथांत उजेड पडे १५१
शिंदेशाई तोडे राम सीतेला देणार
रामरायाच्या रथांत त्याचा उजेड पडणार १५२
चला जाऊं पाहूं रामरायाची बिछाई
शेजारी रत्न टीक सीताबाई १५३
चला जाऊं पाहूं रामरायाची बैठक
हासून विडा देई सीताबाई १५४
नदीपलीकडे कोणाची पालखी
रामरायाची जानकी उतरली १५५
मोठी मोठी मोती रामरायाच्या सदर्याला
राणी मागते गजर्याला सीताबाई १५६
मोठी मोठी मोती रामरायाच्या कोटाला
राणी मागते गोटाला सीताबाई १५७
मोठी मोठी मोती रामरायाच्या पगडीला
राणी मागते बुगडीला सीताबाई १५८
शिंदेशाई तोडे सीताबाई कधीं केले
राम इंदूरला गेले जव्यासाठी १५९
शिंदेशाई तोडे राम सीतेला देणार
पंचवटीचे सोनार कारागीर १६०