मानीयला भाऊ जातीचा मुसलमान
नका ग त्याला हंसूं दु:खे जाईल त्याचा प्राण १८१
दरसाल येई बहिणीला आठवून
जातीचा मुसलमान प्रेमासाठी १८२
तुझा माझा भाऊपणा जगजाहीर नसावा
लोभ अंतरी वसावा भाईराया १८३
आपण गूज बोलूं डाळिंबीसमान
तूं भाऊ मी बहीण जडे नातें १८४
मानीयला भाऊ तुला तो काय देतो
दिवाळीची चोळी घेऊनीयां घरी येतो १८५
माय तों माहेर बाप तो येंऊ जाऊं
पुढे आणीतील भाऊ लोकलाजे १८६
माय तों माहेर बाप तो माझी सत्ता
नको बोलूं भाग्यवंता भाईराया १८७
गोर्ये भावजयी नको करूं फुणफुण
सांगेन तुझे गुण भाईरायांना १८८
गोर्ये भावजयी नको बोलूं रागें फार
आल्यें मी दिवस चार माहेराला १८९
वयनीबाई भावजयी नको बोलू येग जाग
माझा पेटार्याचा नाग भाईराया १९०
वयनीबाई भावजयी नको बोलू इडीतिडी
माझ्या पाटावाची घडी भाईराया १९१
वयनीबाई भावजयी तुझा भांग ग सरसा
माझा कल्याणी आरसा भाईराया १९२
भावजयांमध्ये वयनीबाई गोरी
कपाळी शोभे चिरी कुंकवाची १९३
गोरी भावजय गर्विष्ठ बोलाची
मला गरज लालाची भाईरायाची १९४
वयनीबाई भावजयी नको उभ्याने कुंकू लावूं
नवसाचा माझा भाऊ किती सांगूं १९५
भाऊ ग आपला वयनीबाई ती लोकांची
मने राखावी दोघांची ताईबाई १९६
दादाराया बाजारांत वयनीबाई मारी हांका
उंची खण घेऊं नका वन्सबाईंना १९७
गोर्ये भावजयी किती उर्मट बोलणे
मन दुखविशी भाईरायाचे कोवळे १९८
गोर्ये भावजयी किती बोल अहंतेचे
फूल कोमेजलें भाईराया ममतेचे १९९
गोर्ये भावजयी किती बोल ग रागाचे
फूल कोमेजलें देवा शिवा शंकराचे २००