तिला कोणी मीना म्हणत, मिनी म्हणत.

श्रीमंती बापाची एकुलती एक ती मुलगी. पुन्हा बाई लहानपणीच निवर्तलेली. श्रीनिवासरावांनी पुन्हा लग्न केले नाही. गडगंज संपत्ती होती. आजूबाजूचे टोळभैरव सांगावयाचे, ''तुम्ही पुन्हा लग्न करा. एवढया इस्टेटीचा मालक कोण? का चोरापोरांपायी तिची विल्हेवाट लावली जावी असं तुम्हाला वाटतं? लग्न करण्याचं अद्याप वय आहे आणि आपल्या देशात पैसे असले म्हणजे वाटेल त्या वयात नवी नवरी मिळू शकते.'' परंतु श्रीनिवासराव गंभीर राहत.

''लग्न एकदाच लागत असतं. पुनः पुन्हा लग्न लावणार्‍यांना लग्नाचा गंभीरपणा, पवित्रपणा समजत नाही असे मला वाटतं.'' ते म्हणत.

''ज्या मुलामुलींची लहानपणीच लग्न लागली, ज्यांनी संसार काय ते अनुभवले नाही, लग्न काय ज्यांना कळले नाही, त्यांच्यातील जर कोणी लहानपणीच मेलं तर त्यांनी काय करावयाचं?'' असा एकदा एकाने श्रीनिवासरावांना प्रश्न केला होता. त्या वेळी ते म्हणाले, ''आता अशी लग्नं फार होत नाहीत. परंतु समजा, नवरा लहान असताना त्याची वधू वारली किंवा वधू लहान असताना तिचा पती वारला, तर त्यांची निःशंकपणे पुन्हा लग्नं लावावीत. वास्तविक ते विवाहच नव्हेत. विवाहातील प्रतिज्ञांचे अर्थ त्यांना कळत होते का? विवाह नव्हते-ती गंमत होती. ती वेडया आईबापांची हौस होती. परंतु ज्यांची लग्नं मोठेपणी झाली किंवा लहानपणी होऊनही जी वधू-वरे वयात राहूनही एकत्र राहिली सवरली, त्यांना माझ्या दृष्टीनं पुन्हा विवाह नाही. पतिपत्नींची परस्परांस ओळख झाली आहे, मूलबाळ झालं आहे. एकमेकांच्या जीवनात एकमेक शिरली आहेत, अशांना कोणतं पुन्हा लग्न?''

''परंतु अद्याप शांत-काम ती झाली नसतील तर? वेडेवाकडे पाऊल पडण्यापेक्षा  संरक्षण म्हणून पुन्हा लग्न करून संयमी जीवनाचा मर्गा पत्करणं श्रेयस्कर नाही का? अतिउच्च ध्येय डोळयांसमोर ठेवून पतित होण्यापेक्षा-दरीत पडण्यापेक्षा-मर्यादित ध्येय डोळयांसमोर ठेवून थोडयाशा तरी उंचीवर भक्कम पावलं रोवीत जाऊन उभं राहणं योग्य नाही का?''

अशा प्रश्नाला श्रीनिवासराव उत्तर देत, ''तुमचं म्हणणं मला मान्य आहे. ज्यांना तसं राहणं अशक्य वाटत असेल त्यांनी पुन्हा विवाह करावेत. परंतु प्रथम पत्नीच्या प्रेमाचा या जन्मीच नाही तर जन्मोजन्मी पुरेल इतका सुगंध ज्यांच्या जीवनात भरून राहिला आहे, तो त्या सुगंधाच्या सामर्थ्यानं तरून जाईल. पतीच्या जीवनातील अमर माधुरी जिनं चाखली असेल, तिला दुसर्‍या संरक्षणाची जरूरी नाही. मिनीची आई माझ्या जीवनात भरून राहिली आहे. ती मेली असे मला जणू वाटत नाही. जिवंतपणी ती माझी होती. त्यापेक्षाही अनंतपटीनं आज ती माझी झाली आहे. जिवंतपणी आमच्या प्रेमैक्यात थोडा तरी पार्थिवतेचा अंश होता. परंतु आज केवळ चिन्मय अभंग निर्मळ नाते जोडलले आहे. माझे हृदय फाडून दाखविता आलं असतं, तर तिथे मिनीची आई प्रेमवीणा वाजवीत बसलेली तुम्हाला दिसली असती.''

श्रीनिवासराव असे बोलत व शेवटी त्यांचा गळा भरून येई. डोळे भरून येत. ती चर्चा त्यांना असह्य होई. ते पटकन् उठून जात व शयनमंदिरातील मिनीच्या आईच्या तसबिरीसमोर थरथरत उभे राहत. क्षणभर तेथे बसत. रडवेला चेहरा पुन्हा प्रफुल्लित होई. जणू अमृतरस मिळे त्यांना.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel