''माझे वडील मामलेदार आहेत. मी खादी वापरीन तर त्यांच्या नोकरीला धोका येईल.'' ललितमोहन म्हणाला.

''तुमचा मुलगा कोणता कपडा वापरतो हे काही कलेक्टर मामलेदाराला विचारीत नाही. पुष्कळ सरकारी नोकरही आता खादी वापरतात. खादी खपवितात.'' मुकुंदराव म्हणाले.

शाळेत ही गोष्ट झाली. परंतु त्याचे परिणाम निराळेच झाले. मामलेदारसाहेबांकडून शाळाचालकांस बोलावणे आले. गणपतराव तेथे गेले. शिपायाने आत जाऊन सांगितलं की,''शाळेचे चालक आले आहेत.''

''आत घेऊन ये त्यांना.'' साहेब म्हणाले.

गणपतराव नम्रपणे आत आले व उभे राहिले.

''बसा ना हो, या असे.'' साहेबांनी सांगितले.

''आज सकाळीच का बोलावलं? काही विशेष काम?'' गणपतरावांनी प्रश्न केला.

''तसं काही विशेष काम नाही. परंतु तुमच्या संस्थेबद्दल मला आपलं फार वाटतं. संस्था वाढावी, भरभराटावी असं मनात येत असतं. '' साहेब बोलले.

''संस्थेवर सर्वांची कृपादृष्टी असेल तरच ती चालेल. कोणी अधिकारी वगैरे येणार आहेत की काय?'' गणपतरावांनी विचारले.

''सध्या तर नाही कोणी येणार. परंतु तुम्हाला दोन हिताच्या गोष्टी मी सांगणार आहे. तुमच्या शाळेत यंदा एक नवीन शिक्षक आले आहेत.''मामलेदार म्हणाले.

''हो. मोठे चांगले आहेत शिक्षक. मुलांत मुलांसारखे, थोरांत थोरांसारखे. कळकळ आहे, वाचन आहे, विद्वत्ता आहे. पुन्हा साधे. मुलांना त्यांचं वेड लागलं आहे. शाळेला चांगलीच जोड मिळाली.'' गणपतरावांनी सांगितले.

''तसे ते चांगले असतील. परंतु काही काही शिक्षक फाजील उत्साही असतात. पुस्तकातलं शिकवण्याऐवजी भलत्याच गोष्टी सांगू लागतात. अहो, काल त्यांनी आमच्या ललितच्या धोतरावरच टीका केली. म्हणे खादी का नाही नेसत? आता याचा काही संबंध आहे का? अहो, आम्ही सरकारी माणसं. सर्व बाजूंनी पाहावं लागतं. आमच्यावरही गुप्त पोलीस असतात. ललितला ते बोलले. मुलं त्याला हसली. त्याला हसली म्हणजे मलाच हसली. असले शिक्षक शाळेला धोका देतील. शाळेची ग्रँट वाढत नाही म्हणता आणि असली विषं पुन्हा जवळ बाळगता?'' मामलेदार आवाज चढवत म्हणाले.

''मला तर ते शिक्षक विषमय न वाटता अमृतमय वाटतात. त्यांचा सहवास सर्वांना स्फूर्तिप्रद वाटतो. त्यांच्या संगतीत जरा वरच्या वातावरणात गेल्यासारखं वाटतं.'' गणपतराव गंभीरपणे पण शांतपणे म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel