तुम्ही विराट हिंसा पेरलीत, तिची ही फळं. शेतकर्‍याला हिंसक नका म्हणू. इतके दिवस तो शांत कसा राहिला, अजूनही पेटून उठत कसा नाही? हे पाहा व त्याला अहिंसेचं प्रशस्तिपत्रक द्या. तुम्ही-आम्ही सर्वांनी शांतीचे धडे त्या किसानाच्या पायाशी बसून घ्यावेत. ढोपर-ढोपर चिखलातून, काटयातून जातो; थंडीवार्‍यात, शेतात खळयात राखण करतो, साप म्हणत नाही, विंचू म्हणत नाही; असं करूनही घरी दाा नाही, घरी वस्त्रं नाही. पोरं आजारी, उपाशी. बायकोच्या अंगावर सोन्याचा मणी नाही. धड वस्त्रं नाही. तरी सावकार ओटीवर आला तर त्याला आदरानं घोंगडी पसरतो. अशा शेतकर्‍याचे पाय धरा.  त्याच्याजवळ अहिंसा शिका व म्हणा, 'आजपर्यंत राक्षस होतो. हिंसक होतो. रक्त शोषून-शोषून तिळतिळ करून तुम्हाला मारलं. अतःपर नाही करणार हे पाप. क्षमा कर शेतकरी राजा.' शेतकर्‍याच्या क्षमेला काही सीमा आहे की नाही? आज खादी घालून तुम्ही आपली लूट सांभाळू पाहता, खादीचं चिलखत घालून आपली पिळवणूक अमर करू पाहता. परंतु सत्यस्वरूप बाहेर पडेल. खादी म्हणजे गरिबांचं स्मरण. आहे का तुम्हाला ते स्मरण? दिसतं का तुम्हाला त्याचं मरण? महात्माजी एकदा नरकेसरी बॅ. अभ्यंकरांना उद्देशून म्हणाले, 'अभ्यंकर, तुम्हाला अजून पोटभर खायला मिळत आहे. ज्या दिवशी तुम्हाला पोटभर खायला मिळत नाही तरी तुम्ही दरिद्री नारायणाची सेवा करीत आहात असं मला कळेल, त्या दिवशी मी आनंदानं नाचेन.' तुम्ही महात्माजींचे असल्याचा दावा करता, याप्रमाणे आहे का तयारी? महात्माजी म्हणजे होमकुंड आहे. तेथे होम करावा लागतो. दरिद्री नारायणासाठी बंगल्याचा होम. खादीचं गादीशी पटणार नाही. किसानांची ती कठीण दशा. कामगारांची तीच.

''हे त्र्यंबकराव कामगारांबद्दल सांगत आहेत त्या कामगारांच्या चाळींतील विहिरीत किती किडे पडले आहेत पाहा म्हणावं जाऊन. सांगितलं, ती विहीर जरा नीट करा. तर उत्तर मिळालं, आम्ही का बांधलेले आहोत? तुम्ही कामगारांस पिळून टाकण्यासाठी बांधलेले आहात वाटतं? त्या दिवशी तो एक कामगार मास्तरांचे पाय चेपीना म्हणून त्याला काढून टाकण्यात आलं. स्त्रियांपासून कोमल सेवा तर नेहमी घेण्यात येते., परवा वीस वर्षं काम करणारा काढून टाकला. कारण तो युनियनचं काम करतो. कोठे जावं त्यानं? तुमच्यापेक्षा परकी सरकारं बरी. ते तरी थोडं पेन्शन देईल. काही प्रॉव्हिडंट फंड देईल. परंतु तुम्हा मालकांची जहरी लहर म्हणजेच सारं. लहर आली, काढा कामगार. लहर आली, हाकला कुळाला. ही लहर कोण सांभाळणार तुमची? लाखो लोकांची जीवनं का तुमच्या लहरीवर लोंबकळत ठेवायची? शाळांतून तोच गुलामीचा प्रकार. अमकं केलंस तर नादारी बंद करू; अमूक केलंस तर शाळेतून हाकलू. मुलं म्हणजे का मेंढरं? मुलांना काही मन आहे की नाही? मुलांना म्हणे स्वतःचं कळत नाही. सांगावं तिकडे जातात. तुम्ही सांगता तिकड का वळत नाहीत? मुलांची मनं निर्मळ असतात. त्यांना अधिक चांगलं दिसलं की एकदम तिकडे जातात. पुष्कळ वेळा मुलंच अज्ञान असतात. वयात आलेले बरबटलेले दगड बनतात. लहान मुलांन देव पटकन मिळतो. सत्याचा सूर्याचा प्रकाश तेथे लवकर पडतो. विद्यार्थ्यांनी राजकारणात पडावं की पडू नये असल्या चर्चा या आपल्या करंटया देशातच चालू राहतात. गुलाम राष्ट्रातील सर्वांचं काम एक आहे की, गुलामगिरी दूर करण्याला मदत करणं. मित्रांनो, स्वतःचं नाणं निर्मळ करा. हिंसक आपण बडे लोक आहोत. श्रमजीवी जनता अहिंसक आहे. अद्याप राहिली आहे. परंतु त्यांच्या अहिंसेची सीमा गाठू पाहाल तर फसाल. साधा कर्जकायदा   लहानसा येणार, त्याला तुमचा विरोध; बारीकसा कूळकायदा येणार, त्याला तुमचा विरोध, कामगारांना साधी माणुसकी द्यायला विरोध; असंच जर चालावयाचं असेल तर सावध राहा. असंतोषाची लाट तुम्हाला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. महात्माजींसारखा युगपुरुष आज लाट थोपवीत आहे. परंतु त्यांनीही एकदा एका जमीनदाराला सांगितलं,''तुमचं जगणं-मरणं तुमच्या कृतीवर अवलंबून आहे.' सर्वोदय व्हावा, सर्वांनी मिळतं घेऊन सुखानं नादावं, सर्वांनी थोडंथोडं झिजून प्रचंड इमारत उभारावी असं त्या महापुरुषाला वाटत आहे. किसान कामगार झिजतच आहेत. आता तुम्ही दगड थोडे झिजा, ओले व्हा. तुम्ही काळाचं स्वरूप ओळखून वागणार नसाल तर काळाची कुरोंडी व्हा.  महात्माजी म्हणतात, 'तुम्ही पुंजीपती गरिबांचे विश्वस्त बना.' विश्वस्त म्हणजे नागोबा नव्हे. किसान-कामगार मागतील तो आधार त्यांना कुरकुर न करता देणं हा त्याचा अर्थ तुम्ही मला सांगायला आलात; ठीक. संपूर्ण अहिंसा माझ्या जीवनात अनंत जन्मांनी येईल. ती यावी, मला इच्छा आहे. कठोर शब्द माझ्या तोंडातून जातात. धीरगंभीर शांत पर्वतही कधी-कधी ज्वालामुखी होऊन आग ओकू लागतात, मग आमच्यासारख्यांची कथा काय? किसान-कामगारांची बाजू घेताना माझ्या तोंडून रागानं शब्द गेला तर देव माझ्यावर फार रागवेल असं मला वाटत नाही. तो तसा जाऊ नये म्हणून मी प्रयत्न करीन. दुसरं मी काय सांगू?''

ती मंडळी उठून गेली. मुकुंदरावांनी प्रणाम केला. दार लावून ते पुन्हा आपल्या घोंगडीवर बसले. ते उठले व खिडकीजवळ उभे राहिले. कोणाकडे पाहत होते? त्यांचे डोळे वाहू लागले. त्यांना अश्रूंचा पूर आवरेना. दगडूशेटांसारख्यांना का मला सत्य-अहिंसेचाा उपदेश करावा? खोटेनाटे करण्यात रंगलेले हे लोक, यांनी येऊन मला हिंसक ठरवावे? परंतु मला अहंकार कशाला? मी त्यांच्याकडे कशाला बघू? होऊ दे मला निर्मळ, निर्दोष. किती विचार त्यांच्या हृदयात उसळत होते. डोंगरावरून पावसाळयात शतप्रवाह वाहात असतात. तसे मुकुंदराव दिसत होते; परंतु शांत झाले. ते पुन्हा चरख्यावर कातीत बसले. किती वेळ बसले त्याचे त्यांना भान नव्हते, सूर्य मावळला. त्याचे लाल रंग पसरले होते. खोलीत एक सौम्य प्रकाश पसरला होता. प्रकाश गेला आता अंधार येऊ लागला. अंधारात प्रकाश देणारी प्रार्थना मुकुंदराव म्हणू लागले; अभंगात ते तल्लीन झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel