''बाबा, या चिंध्या नाहीत. ज्यांच्या अंगावर चिंधी नाही अशा माय-बहिणींची अब्रू आहे ही. ही खादी त्यांची अब्रू सांभाळते. बाबा, अब्रूची किती किंमत?'' रामदासने विचारले.

''भाऊ, गरिबाला आहे कोठे अब्रू? कोर्टकचेरीत विचारतात, 'किती शेतसारा भरतोस, किती इन्कमटॅक्स भरतोस? जो अधिक शेतसारा भरतो, अधिक इन्कमटॅक्स भरतो, त्याची साक्ष म्हणजे खरी आणि ज्याच्याजवळ जमीन नाही त्याची साक्ष पै किंमतीची. अधिक शेतसारे भरणारे, अधिक इन्कमटॅक्स भरणारे हे वास्तविक चोर. खोटे व्यवहार करून त्यांनी इस्टेटी जमविल्या. दोन-दोन जमाखर्च ठेवतात, परंतु शेवटी त्यांचा शब्द, सत्याचा, त्यांना अब्रू.'' शांता म्हणाली.

''पोरी, मग आम्ही का चोर?'' गोविंदरावांनी विचारले.

''शांता सर्वसाधरण म्हणत आहे. तुम्हाला नाही उद्देशून बाबा.'' रामदास म्हणाला.

''भाऊ, सोनखेडीची ही खादी, होय ना?'' शांतेने विचारले.

''हो बाबा, हृदयाची किंमत अमोल असते. शेकडो हृदयं या खादीनं मी जोडली. 500 रुपडया देऊन जर अशी हृदयं मिळाली तर चांगला नाही सौदा?'' रामदासाने हसत विचारले.

''गरिबांचे शिव्याशाप मिळण्याऐवजी त्यांचे मंगल आशीर्वाद मिळणे हीच खरी संपत्ती. मी कदाचित ही निर्जीव जड संपत्ती गमावून बसेन. परंतु जिवंत संपत्ती जोडीन. गरिबांच्या हृदयांचा सम्राट होईन. हे बंगले राहणार नाहीत. परंतु गरिबांची हृदयमंदिरं मिळतील.'' रामदास म्हणाला.

''माझे डोळे मिटो, माझ्या पाठीमागो काही होवो.'' गोविंदराव खिन्नतेने म्हणाले.

''बाबा, मी काय वाईट केलं? मी जाऊ घरातून?'' रामदासाने दुःखाने विचारले.

''रामदास, एक तरी माझे ऐक. खादीचा नाद तुला लागला आहे. पण खादीच्या पलीकडे जाऊ नकोस.'' गोविंदराव म्हणाले.

''म्हणजे काय?''शांताने विचारले.

''क्रांतिकारक होऊ नकोस.''

''बाबा, क्रांती म्हणजे दुसरं काय? क्रांती म्हणजे रक्तपात नव्हे. श्रमणार्‍याला सुखी करणं म्हणजे क्रांती. त्यांची मान उंच करणं म्हणजे क्रांती.'' रामदास म्हणाला.

''शिवतरला मी क्रांती केली. म्हातार्‍या बायका शिकू लागल्या. तरुण शिकू लागले. मोहन त्यांना शिकवणार आहे. अज्ञानाच्या अंधारात मी दिवा नेला.'' शांती म्हणाली.

''सोनखेडीच्या मायाबहिणींनी दिवाळी गोड केली असेल. दुःखानं रडत बसण्याऐवजी हसल्या असतील. दुःखितांना हसविणं, पडलेल्याला उठविणं, मरणार्‍याला जगवणं, श्रमणार्‍याला पूजणं म्हणजे क्रांती.'' रामदास म्हणाला.

''या दिवाळीत तुम्ही असे दिवे लावले एकूण?'' गोविंदराव जरा हसून म्हणाले.

''हो बाबा, हीच खरी दिवाळी. हेच दिवे विझले न जाता अधिक कसे पेटतील हे पाहण्याचं सामर्थ्य आम्हाला येवो.'' रामदास म्हणाला.

''येईल, ते सामर्थ्य येईल.'' शांता भविष्य बोलली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel