तो सभोवती पाहू लागला. अंगाभोवती पाहू लागला. कोठे होती ती भगवी वस्त्रे? कोठे गेला तो संन्यास? कोठे गेला तो 'संयम राख' असे सांगणारा दंड? कोठे गेला कमंडलू? संन्याशी सारे आठवीत होता. मध्येच डोळे मिटी. मध्येच उघडी. मिनीकडे पाही, मिनीच्या सचिंत मुखावर किती कोमल भाव होते ! हे काय, मिनी हसली. ती जागी आहे का झोपेत आहे? लहान मूल झोपेत हसते. निष्पाप असे ते हास्य किती मधुर असते. संन्यासी त्या स्मितरम्य ओठांकडे पाहत राहिला. तो एकदम मिनीने डोळे उघडले. तिच्या डोळयांसमोर ते संन्याशाचे डोळे होते. डोळे डोळयांकडे बघत होते. दोघेजण डोळे मिटीत व एकदम उघडीत.

मिनी उठली. तिने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे ते गोड डोळे पुसले. शांत व गोड वाणीने ती म्हणाली, ''पडून राहा हं.''

संन्याशाला शुध्दी आली. सर्वांना आनंद झाला. मिनीने साखर वाटली. हळूहळू संन्यासी बोलू लागला. सारी विचारपूस करू लागला. परंतु त्याने भगव्या कपडयांबद्दल एक ब्र ही काढला नाही.

एके दिवशी दुपारी मिनी त्याला मोसंब्याचा रस देत होती. रस दिल्यावर ती तेथे बसली.

''माझ्या अंगावरची वस्त्रं कोठे आहेत?'' संन्याशाने विचारले.

''ती पाहिजेत का? ती माझ्या ट्रंकेत मी ठेवली आहेत.'' मिनी म्हणाली.

''नकोत ती. मी त्यांचा त्यागच करणार होतो. अशा वस्त्रांनी दंभ माजतो. हृदय वैराग्यानं रंगलेलं असलं म्हणजे झालं. बाह्य रंग काय चाटायचे?'' तो म्हणाला.

''तुम्ही कुठून येत होता?'' तिने विचारले.

''मी गेलो होतो देव मिळावा म्हणून. परंतु देव मिळेना. एका गुरुजवळून दीक्षा घेतली. जपतप सारं केलं. देव मिळेना. परंतु एक अधिकारी पुरुष मला म्हणाला,''तुला देव का पाहिजे? हरिजनांची सेवाचाकरी कर तुला देव मिळेल, निरहंकार झाल्याशिवाय कोठला देव?' त्या शब्दांनी मी जागा झालो. मी निघालो. विचार करीत करीत निघालो. उंच पहाडावरून खाली आलो. गंगा स्वर्गात असून काय उपयोग? खाली मैदानातच येऊन ती ओलावा देईल तरच तिची कृतार्थता. नद्या डोंगरातच दडून बसतील तर मळे पिकणार नाहीत आणि नद्यांचाही विकास होणार नाही. खरं ना?''

त्या संन्याशाचे शब्द मिनेला अमृताप्रमाणे लागत होते.

''माझी पिशवी कोठे आहे?''त्याने विचारले.

मिनीने पिशवी काढून दिली. त्यात एक टकळी होती. कापूस होता.

''हे काय?''तिने विचारले.

''हा नवीन सेवेचा मंत्र.'' तो म्हणाला.

''तुम्ही खादीचे उपासक आहात?''तिने विचारले.

''जो जो माणुसकी असलेला हिंदी मनुष्य असेल तो तो तिचा उपासक होईल. माझ्या अंगावर भगवी वस्त्रं नकोत. परंतु खादीची हवीत. नाही तर मी मरेन !'' तो उत्कटतेने म्हणाला.

मीना तेथून उठून गेली.

''बाबा, मी विलासपूरला जाऊन खादी घेऊन येतो. मला द्या ना पैसे. मोटार घेऊन जाते.'' ती म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel