''रामदास, काय होतंय बाळ?'' गोविंदरावांनी विचारले.

''माझ्या सार्‍या अंगाची आग-आग होत आहे.'' तो रडत म्हणाला.

''डॉक्टर, काय असेल हो?'' रामरावांनी विचारले.

''मी वांतीचं औषध देतो. पोटात काही गेलं असेल तर कळून येईल.'' डॉक्टर धीर देत म्हणाले.

रामदासची आई त्याच्याजवळ बसली. बाकी मंडळी जरा दूर गेली. कोणी म्हणू लागले, 'दृष्ट पडली.' कोणी म्हणाले, 'जागरण झाले असेल.' नाना तर्क चालले होते. परंतु एकाने सांगितले की, 'खाली कोणी गाणे म्हणत होता. ते ऐकून भाऊसाहेब खिन्न झाले व आत येऊन रडू लागले.'

''हाकलून लावा त्या भिकार्‍याला. या रस्त्यावर येऊ देऊ नका. गांधींच्या लोकांना काही काळवेळही नाही. समारंभाच्या वेळीही सुतक्यासारखे येतात व रडकी गाणी गाऊन लोकांना रडवतात.'' एक देशी साहेब म्हणाला.

त्या गाणे म्हणणार्‍या मुलास हाकलून लावण्यासाठी भुतावळ धावली. परंतु दरवाजात शांता होती.

''नका रे त्याला हाकलू. कसं गोड म्हणतो आहे गाणं !'' ती म्हणाली.

''तुला गाणं गोड लागतं आहे. पण तिकडे भावाचा जातो आहे प्राण.'' एकजण गरजला.

''भाऊचा हा मित्र आहे. हा भिकारी नाही. हा त्या सोनखेडीच्या आश्रमातील दयाराम. भाऊजवळच त्याला न्याल तर भाऊला बरं वाटेल. भावाचे जाणारे प्राण परत येतील.'' शांता शांतपणे म्हणाली.

परंतु त्या पोरीचे कोण ऐकतो? दयाराम निघून गेला. शांता वर गेली. भावाच्याभोवती गर्दी होती. डॉक्टरांचे औषध आले. भाऊने ते फेकून दिले. सारे लोक सचिंत झाले. पाहुणेमंडळी हळूहळू जाऊ लागली. कारण गाणेबजावणे आता बंद करावे लागले. फोनोच्या प्लेटी बंद झाल्या.

''रामदास, काय होतंय तुला ते सांग.'' गोविंदराव म्हणाले.

''आग नाही का की होत?'' नव्या आईने विचारले.

''किती काळवंडला चेहरा ! दृष्ट पडली.'' सख्खी आई म्हणाली.

''आई, त्या गाणं म्हणणार्‍याला येथे आणाल तरच भाऊच्या अंगाची आग थांबेल.''शांताने सुचविले.

''त्यामुळे तर आग पेटली.'' लोक म्हणाले.

''तोच विझवील.'' शांता म्हणाली.

''बोलवा त्या भिकार्‍याला.'' गोविंदरावांनी सांगितले.

पूर्वी जे नोकर-चोकर त्याला हाकलण्यासाठी धावले होते, तेच आता त्याला शोधून आणण्यासाठी धावले.

''मी कशाला येऊ?'' दयाराम म्हणाला.

''अरे, चल बाबा.'' नोकर म्हणाले.

''त्या बंगल्यात माझ्याही अंगाची आग होईल. श्रीमंतांचे बंगले म्हणजे हजारो दरिद्री नारायणांच्या जळणार्‍या चिता. ते भिंतीवर तांबडे, निळष, हिरवे रंग म्हणजे त्या ज्वाला. कशाला मी येऊ? ''दयाराम पुन्हा म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel