जिकडे तिकडे पाणीच पाणी. लाल नाचणारे भीषण पाणी. फेस उसळत आहे. लाटा नाचत आहेत. झाडेमाडे मधूनच माशाप्रमाणे वर डोकी काढून जात आहेत. जणू नद्यांनी हिरव्या पाचूचे दागिनेच घातलेले होते. हिर्‍याची हिरवी कुडी घातली होती. पाणी इतके चढले होते की, मोठमोठी उंच झाडे तीही बुडून गेली होती. जी फारच उंच झाडे, त्यांचा काही भाग बुडालेला नव्हता. ती उंच झाडे रक्तांबर नेसून तपश्चर्या करीत होती. त्या झाडांच्या अंगावर बघा मजा.  तपश्चर्येत रममाण झालेल्या त्या तरूंना कशाचेही भान नाही. सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे आज सारे साप बाहेर पडले. त्यांची बिळे पाण्याने भरली. पाण्यावर साप सळसळ करू लागले. ते सारे साप झाडावर चढले. आसपासच्या शेकडो मैल टापूतील तमाम साप, सार्‍या प्रकारचे. सार्‍या रंगाचे, पाण्यातून सळसळत येत व झाड दिसताच त्यावर चढत. भयंकर देखावा ! किती रंगांचे हे साप काळे, लाल, पिवळे, हिरवे, पांढरे, निळे पट्टयांचे अनेक रंगांचे हजारो भुजंग आसपासच्या झाडांवर लटकले होते. झाडांना वेढून बसले होते. एका सापाच्या अंगावर दुसरा, दुसर्‍याच्या अंगावर तिसरा. हिरव्याच्या अंगावर पिवळा, पिवळयाच्या अंगावर काळा, जणू नाना रंगांचे प्रचंड दोरखंड वळले जात होते. खाली पसरलेला लाल पाण्याचा समुद्र, त्याचे काय मंथन करावयाचे होते? ती झाडे म्हणजे जणू घुसळण्याची रवी व ते साप म्हणजे दोरी. कोण करणार रे घुसळण? का त्या वृक्षांच्या मुंजी होत होत्या. त्यांच्या कमरेला हिरवीपिवळी मौन्जीमेखला बांधली जात होती ! का ती झाडे शिवाचे दूत होती? सपाट सुंदर मैदानातून इतके का साप राहत होते? आज बाहेर पडले. माणसाचे असेच आहे; माणूस वरून दिसतो शांत, दिसतो साधा; परंतु जर का त्याच्या जीवनात वादळ सुटले तर हृदयाच्या बिळातून सापच साप बाहेर पडतात. डोळे आग पाखडू लागतात, जीभ नागिणीप्रमाणे दंश करते. हात सापाप्रमाणे वळवळत असतात. लहानसा माणूस, परंतु त्याच्याजवळ सापाचे केवढे भांडवल असते ! पुन्हा ते साप लपतात, पुन्हा डोळे निवळतात, जीभ गोड होते, हात शांत होतात.

ते पाहा, अद्याप साप येतच आहेत. सापाच्या अंगाच्या गुळगुळीत भिंतीवर ती वर चढू पाहत आहेत. घसरले, सरकले, पडले पुन्हा अनंत पाण्यात; पुन्हा धडपड. गाठले त्यांनी ते झाड. पुन्हा पुन्हा प्रयत्न सुरू. जीवनाची धडपड शेवटपर्यंत सुरू असते. ते काही साप फांद्यावरून अर्धवट लोंबकळत आहेत. एक-दोन विळखे घालून त्यांनी आपले पाय खाली सोडले होते. नवीन चढणारे साप एकदम उडी मारीत व त्या लोंबकळणार्‍या शेपटांना मिठी मारीत व तेथेच लोंबकळू लागत. जणू त्यांची सर्कस चालली होती, वेतावरचा मलखांब चाललेला होता ! सापाला साप अशी ती नाना रंगी दुव्यांची साखळी तयार होत होती. कोणाच्या कमरेला ती घालायची? ते लोंबकळणारे साप वटवृक्षांना फुटणार्‍या पारंब्यांप्रमाणे दिसत होते.

ते पाहा गारुडी, साप पकडणारे निर्भय लोक. त्यांनी अशा महापुरात नावा घातल्या आहेत नि पाण्यात सुंदर सुंदर रंगाचे साप पकडता येतील म्हणून त्यांना आनंद झाला आहे. मरणाशी खेळ खेळणारे लोक ! सापांना पकडू पाहणारे हे लोक साधा पोलीस आला तर मात्र पळून जातात. माणसे सापापेक्षा भयंकर असतात का?

साप पकडणे सोपे नाही. ती पाहा त्यांनी नाव झाडाजवळ नेली. ओढला त्यांनी साप, तोंड धरून ओढला. अरे सुटले तोंड, केला दंश त्या सापाने परंतु दुसर्‍याने पुन्हा धरले ते तोंड. पहिल्याने बोट झटकले. काढलीन् काही मुळी व त्याने खाल्ली. पेटार्‍यात घातला त्यांनी साप, अरे मराल की, पुरे हा खेळ. ते हसून म्हणत, ''मरायचे तर आहेच. सापाशी खेळ करून मरू. सापाला माणसावळयाच्या उद्योगात मरू.''

पूर ओसरले. नद्या शांत झाल्या. सर्वत्र पडापड झालेली. सर्वत्र रडारड चाले. ठायी ठायी माणसे पुंजके करून बसली होती. कोणाची मुले गेली. कोणा मुलांचे आईबाप गेले. पत्नीचा पती गेला. भावाच्या बहिणी गेल्या. बहिणीचे भाऊ गेले. प्रत्येकाचे कोणी तरी गेले होते, काही तरी हरवले होते. अंगावर वस्त्र नाही, पोटात घास नाही, राहायला घर ना दार आणि थंडी पडू लागली. पुन्हा पाण्यातून वाचलेली थंडीत मरू लागली. ठिकठिकाणी गाईगुरे मरून पडली होती. माणसे मरून पडली होती. प्रेतांची घाण सुटली. मरीमाई सुरू झाली. रोग उठू लागले. ते ओले मरण, आता कोरडे मरण !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel