महाराष्ट्र मर्यादा ओळखतो. महाराष्ट्रातील नद्या अफाट नाहीत, पर्वत नगाधिराजाप्रमाणे नाहीत. महाराष्ट्रातील पर्वत उंच आहेत, पुष्कळ उंच आहेत. परंतु हिमालयाप्रमाणे आकाशाला हात लावू पाहण्याच्या भानगडीत ते पडणार नाहीत. महाराष्ट्रातील भावना व विचार यांना संमय असतो. डोके कितीही उंच नेले, तरी पृथ्वीला आमचे पाय चिकटलेले असतात. आमच्या हृदयाशी सह्याद्री आहे. आमचे हृदय सह्याद्रीप्रमाणे आहे. ते हृदय ओले असेल, परंतु वाटेल तसे वाहणार नाही. बंगालजवळ भागीरथी आहे. पद्मेसारख्या चार-चार मैल रुंद होणार्या सागराप्रमाणे नद्या आहेत. बंगाली हृदयही सागरासारखे. महाराष्ट्रातील संतही मर्यादा सांभाळतात. बंगालमधील चैतन्यप्रभू पुरीजवळील निळा-निळा सुंदर समुद्र पाहून 'माझा कृष्ण, माझा कृष्ण' म्हणत सागरात शिरले. असे वेडे प्रेम महाराष्ट्रीय संतांत दिसणार नाही. ''भले तरी देऊ गांडीची लंगोटी । नाठाळाचे माथा हाणू काठी ॥'' असे महाराष्ट्रीय संत म्हणतील. ''दया तिचे नाव भूतांचे पालन। आणिक निर्दलन कंटकांचे ॥' असे ते सांगतील. येथे रोखठोक काम. सद्गुणांचा अतिरेक म्हणजे दुर्गुण. प्रकाशाचा अतिरेक म्हणजे अंधःकार! डोळे मिटून जाणे. भावनेच्या अग्नीने बंगाल लोण्याप्रमाणे विरघळेल. महाराष्ट्र लोखंडाच्या गोळयाप्रमाणे लाल होईल. महाराष्ट्राजवळ विवेक आहे, अतिरेक नाही. ''विवेकासहित वैराग्याचे बळ'' हे आमचे सूत्र. सौंदर्य हे प्रमाणबध्दतेत आहे. 'सर्वत्र प्रमाण राखा' असे महाराष्ट्र म्हणेल.
'ही हरिजनाची मुलगी मी कडेवर घेतो व अस्पृश्यता नष्ट करतो,' असे सांगणारे शांतिसागर एकनाथ, 'मस्तानीपासून मुलगा झाला म्हणून काय झाले, त्याची मुंज झाली पाहिजे', असा आग्रह धरणारे पहिले बाजीराव, 'सार्या स्मृती पुरुषांनी लिहिल्या म्हणून त्यांनी स्त्रियांची सोय पाहिली नाही,' असे सांगणारे, 'बालविधवेचा पुनर्विवाह करा', असे सांगणारे, 'स्नानसंध्या करावयाची असेल तर गंगातटाकी चला, राज्यकारभार करावयाचा असेल तर प्रजेच्या हिताच्या गोष्टी हीच स्नानसंध्या माना,' असे सांगणारे निःस्पृह रामशास्त्री; 'मुलाचा हुंडा घेणे म्हणजे महापाप,' असे म्हणणारे थोर सत्कवी मोरापंत ! असा हा स्वतंत्र विचारांचा व स्वतंत्र आचारांचा महाराष्ट्र आहे.
महाराष्ट्राने पडद्यातील पावित्र्य राखले नाही. सरंजामी सरदारांनी मुसलमानांपासून पडदा घेतला. परंतु तो खरा महाराष्ट्र धर्म नाही. पावित्र्य अंधारात पिकत नाही, प्रकाशात पिकते. महाराष्ट्राला बुरखे नाही आवडत. वस्तूवरील बुरखे दूर करून सत्यस्वरूप प्रकट करणे हेच तर महाराष्ट्राचे महान कार्य. ते कार्य कुशलेतेने करण्याऐवजी कधी ओबडधोबडपणे केले जाते, तेथे चुकते. महाराष्ट्रीय स्त्रिया सर्वत्र निर्भयपणे संचार करतील, शेतात कामे करतील. रानातून मोळया आणतील, अंगणात वाघ आला तर त्याला मुसळाने मारतील; चुलीजवळ साप आला तर फुंकणीने ठेचतील. त्या पिंजर्यातील पोपट होणार नाहीत. खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरच्या वारीला पायी जातील. पदर बांधून लढायला निघतील, मुक्ताबाई संन्यासिनीप्रमाणे तेजाने वावरेल. जनाबाई निर्भयपणे नामदेवाकडे रात्रंदिवस दळील. सखूबाई पंढरपूरची वाट धरील. वेणाबाई, अक्काबाई समर्थांच्या शिष्या होऊन आश्रम चालवतील, कीर्तन करतील.
'अंतर्बाह्य स्वातंत्र्य' हे महाराष्ट्रीय संस्कृतीचे सार आहे. महाराष्ट्र स्वातंत्र्याचा उपासक आहे. परंतु ते स्वातंत्र्य संकुचित नाही. 'महाराष्ट्रधर्म भूमंडळात जिकडेतिकडे पसरा' असे समर्थ सांगत. 'कोणता हा महाराष्ट्र धर्म?' 'सर्वांना स्वातंत्र्य दे. तुझे स्वातंत्र्य कोणी हिरावणार नसेल तर सर्वांना जवळ घे.' महाराष्ट्र सर्वांना सुखवू बघतो. 'जगा होऊ आवारू । आनंदाचे', असे ज्ञानदेव गर्जले. 'अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक,' असे तुकाराम बोलले. सर्वोदय हे जे महात्मा गांधींचे ध्येय, तेच महाराष्ट्राचे ध्येय. महाराष्ट्रात सारे आले व राहिले. गुजराती, मारवाडी, भाटे, पारशी महाराष्ट्रात राहिले. व्यापार-संपत्ती त्यांच्या हाती. परंतु महाराष्ट्राच्या मनातही ते आले नाही. महाराष्ट्राने त्यांचा हेवादावा केला नाही. महाराष्ट्र दिलदार व उदार आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्राने आपल्या नद्या कृष्णा, गोदावरी, निजामाला व पुढे आंध्र प्रांताला देऊन टाकल्या, त्याप्रमाणे आपल्या संपत्तीचे प्रवाहही त्याने खुशाल दुसर्याला दिले. सेवा करून महाराष्ट्र बोलणार नाही. पराक्रम करून जाहिरात देणार नाही. मुळशीचा दिव्य लढा हिंदुस्थानात कोणाला माहीत आहे? त्या लढयात अंगावर उडविलेले आधणाचे पाणी मायबहिणींनी गुलाबपाण्याप्रमाणे मानले. परंतु तो अपार त्याग हिंदुस्थानला माहीत नाही. महाराष्ट्राने त्याची पुस्तके लिहून सर्वत्र नेली नाहीत. कीर्तिपराङ्मुख माझा महाराष्ट्र आहे. मुकेपणाने तो शोभतो. इतरांच्या वैभवात आनंद मानील, इतर प्रांतीयांच्या यशात धन्यता मानील. मुकाटयाने आपण बलिदान करील.