अशी ती सोपी, तेजस्वी प्रार्थना शिवतरातील लहान-थोर भगिनी म्हणू लागल्या. वर्गात मोठा आनंद असे. म्हातार्‍या बायांबरोबर लहान मुलीही येत. मोठी गंमत होई. तेथे अक्षरे शिकता शिकता किती तरी दुसर्‍या गोष्टी ऐकायला मिळत.

गावातील तरुण म्हणू लागले, ''आपण का मागे राहावं?'' बायांचा वर्ग सुरू झाला की, बाहेर येऊन ऐकत. बाहेरून बघत. त्यांचीही ज्ञानपिपासा जागृत झाली. एके दिवशी, काही किसान युवक शांतेकडे आले. म्हणाले,''आमचाही वर्ग घेत जा ताई.''

''काय मोहन, तूसुध्दा शिकणार वाटतं?'' शांतेने विचारले.

''मी का माणूस नको होऊ? आमच्या गावातील आयाबहिणी पुढे चालल्या. आम्ही मागं का राहू?'' तेजस्वी मोहनने उत्तर दिले.

''काल माझी बायको म्हणे, 'तुमचं नाव लिहून दाखवते. माहेरी गेले तर तुम्हाला पत्र लिहीन. परंतु तुम्हाला वाचायला कुठं येतं? मग जाल शेजारच्या रमीकडे. माझ्याजवळ शिका आता. ''गणपतने सांगितले.

''परंतु बायको असं म्हणाली म्हणून ओरडला नाहीस ना तिच्या अंगावर? मारलंबिरलं नाहीस ना?'' शांतेने हसून विचारले.

''नाही, ताई. तुम्ही हिताचं तेच करीत आहात. शेतकर्‍यांची फार फजिती बघा. वर्तमानपत्रं हातात असलं म्हणजे मामलेदार खुर्ची देतो, पोलीस रामराम करतो. नाही तर 'तिकडं बस,' 'साब है अंदर', असं सांगून हाकलून देतो.'' गणपतने अनुभव सांगितला.

''हे बघ मोहन, चित्र. हे चीन देशातील आहे. हे शेतकरी शेतात भाकर खायला झाडाखाली बसले आहेत व खाता खाता वर्तमानपत्रं वाचीत आहेत. एका हातात नांगर व दुसर्‍या हातात क्रांती वर्तमानपत्रं. असं होईल तेव्हा स्वराज्य जवळ येईल.'' शांता म्हणाली.

ते तरुण ते चित्र पाहू लागले. काही दुसरेही शेतकरी भोवती जमले. माना डोलावू लागले.

''ताई, धान्य दिवाणखान्यात का कोणी पेरतो? गालिचे, जाजमे यांवर का कोणी पेरतो? धान्य बाहेर शेतात पेरावं लागतं, तेव्हा ते फोफावतं. स्वराज्याचे विचार शेतकर्‍यांच्या नांगराशी येऊन मिळतील तेव्हाच फोफावतील. दिवाणखान्यातील राजकारण का स्वराज्य आणून देईल?'' मोहनने प्रश्न केला.

''मोहन, किती महत्त्वाची गोष्ट सांगितलीस तू, संपत्ती निर्माण करणारे तुम्ही जेव्हा जागृत व्हाल, आजूबाजूस काय चाललं आहे ते पाहाल तेव्हाच स्वातंत्र्य येईल. खरं गोरगरिबांचं स्वातंत्र्य येईल. इंग्रजांनी आपणास अडाणी ठेवलं आणि देशातील श्रीमंतांसही, आपण शिकू तर खपणार नाही. गरीब लोकांना तेथे कॉन्ट्रॅक्टर वगैरे किती छळतात. त्यांच्यात ज्ञान जाईल, निर्भरता जाईल, तर या लुटारूंची लूट मग कशी चालणार?'' शांता लाल होऊन म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel