विद्यार्थ्यांत मोहनबद्दल कुतुहल निर्माण झाले. 'आपल्या खोलीत हा वाचायला बसला म्हणून काय झालं,' असे काहींच्या मनात आले. मुले चालकांना विचारावयास गेली. चालकांनी परवानगी दिली नाही. नोकर शिरजोर होतील, ज्याने त्याने आपल्या पायरीने राहिले पाहिजे, वगैरे सनातन धर्म त्यांनी सांगितला.

मोहन मिळत ते पैसे शांतेला पाठवी. विद्यार्थी सुटीत घरी निघाले की, मोहन त्यांचे सामान स्टेशनवर घेऊन जाई. ते त्याला दोन आणे अधिक देत. भांडी घासणारा मोहन विद्यार्थ्यांचा देव बनत चालला होता. मोहन रस्त्यात भेटला तर मुले त्याला वंदन करीत. एके दिवशी चालकांनी हे पाहिले.

''तुम्ही त्या भांडीघाश्याला रस्त्यात काय नमस्कार करता? हसतात तुम्हाला सारे. वसतिगृहात शिकवतात की काय, लोक म्हणतात.'' चालक मुलांना म्हणाले.

''खडेंघाशापेक्षा भांडीघाशा पूज्य आहे. शिक्षकही वाचीत नसतील अशी पुस्तकं मोहन वाचतो. इतिहास कसा वाचावा, मराठवाडयांच्या इतिहासात कोणती दृष्टी आहे हे मोहनने त्या दिवशी आम्हाला शिकविलं. एकनाथांच्या घरी देव कावडीनं पाणी भरी. आम्हा मुलांची धुणी धुवायला मोहनच्या रूपानं देव आला आहे की काय, न कळे.'' मुले म्हणाली.

मोहन पैसे पाठवी. त्याची पावती येई. पावतीवर स्त्रीचे नाव असे. हे काय कोडे आहे? शाळेचे चालक कुजबुज करू लागले. काही तरी भानगड असावी असे त्यांना वाटले. वसतिगृहाच्या चालकांना या भांडयाघाश्याचा हेवा वाटू लागलाच होता. मुलांना गडयाबद्दल आदर व प्रेम वाटावे आणि चालकाबद्दल काही वाटू नये हे त्यांच्या मनात सले. त्यांनी मोहनला दूर करण्याचे ठरविले. मुले, आम्ही संपावर जाऊ म्हणू लागली.

''हा मनुष्य नीतीचा धड नाही. या पाहा पावत्या, समजलं सारं?'' चालकांनी विचारले.

''स्त्रीला पैसे पाठविणं म्हणजे का पाप? एखाद्या भगिनीला मदत करणं म्हणजे का अनीती?''एका मुलाने विचारले.

''मोहन गेला तर आम्ही संप करू.'' दुसरा एक मुलगा म्हणाला.

चालकांनी हट्ट धरला नाही. परंतु मोहनचे दुर्दैव. अतिशय श्रम करून तो आजारी पडला. ताप अंगात असतानाही तो भांडी घाशीत होता. तेथे तो घेरी येऊन पडला. मुलांना कळल्यावर त्यांनी त्याला उचलून नेले. मोहनला थंडी ताप येऊ लागला. काम वेळेवर होईना. चालकांनी सांगितले, ''आम्ही दुसरा माणूस ठेवतो. संस्थेचं अशानं कसं चालणार?''

मोहन संस्था सोडून गेला. गावात एका एक रुपया भाडयाच्या खोलीत तो राहायला गेला. खोलीत ओल असे. सोबतीला डास होते. मोहन कामाला जाई. शाळेतील काम सुटले. गावात अधिक काम करी. परंतु तो थकत चालला. त्याचा एकच आनंद होता की, शांता शिकत आहे.

शांतेचा एक सुंदर फोटो त्याच्याजवळ होता. ती त्याची इस्टेट. रात्री तो फोटो तो पाही व प्रेमाने हृदयाशी धरी.

मोहन शांतेला पैसे पाठवी. परंतु शांतेचे पत्र कधी येत नसे.  प्रथम एक-दोन पत्रे आली. पुढे बंद. 'शांतेला अभ्यास असेल, लठ्ठ पुस्तकं वाचायची असतील, कोठून होणार तिला वेळ' असे मोहन म्हणे.

शांतेला खरेच वेळ नसे का?

शांता मोठया शहरात गेली व निराळी झाली. तिच्यात क्रांती झाली. शांता कोणाला ओळखू आली नसती. तिची खादी गेली. तिचा साधेपणा गेला. ती आता सुंदर तलम पातळे नेसे. सुंदर सुंदर पोशाख करी. मोहनच्या पैशावर शांता चैन करीत होती. तिला एक नवीन मित्र मिळाला. त्याच्याशी गप्पा-विनोद करण्यात तिचा वेळ जाई.

शांतेच्या जीवनाचा नाश होणार का?

''शांता, येतेस ना त्या बोलपटाला?'' तिचा सोबती विचारता झाला.

''चांगला आहे का?'' तिने विचारले.

''तू बरोबर आलीस म्हणजे सारे बोलपट गोडच वाटतात. तुझा हात हातात घेऊन बोलपटाकडे पाहणं किती सुखाचं वाटतं.'' तो म्हणाला.

''माझा हात हातात धरता येतो म्हणून बोलपटाला जायचं होय?'' तिने विचारले.

''तुझे चिमटेही सहन करण्यासाठी.'' तो म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel