''असा हा अज्ञात त्याग, अशी मुकी बलिदाने ध्येयार्थी कामगार करीत आहेत.'' अब्दुल म्हणाला.

''तुमच्याकडे हिंदू-मुसलमान प्रश्न नाहीत का?'' मुकुंदरावांनी विचारले.

''किसान व कामगार, मुस्लीम लीग व हिंदूमहासभा यांची सोंग-ढोंगं लोक आता ओळखू लागले आहेत. मध्ये काही गुंड एका भगिनीला पळवीत होते, परंतु आम्ही कामगारांनीच ती सोडवून आणली. मागे एक अनाथ हिंदू मूल सापडलं. ते शेवटी आमच्या शशीनं पाळलं आहे. गुंड लोक बाया पळवतात व जमीनदारांच्या, नबाबांच्या जनानखान्यात त्या जातात. बेकार गुंडांचा हा उद्योग असतो. पोटार्थी गुंड ही कामं करतात. या गुंडांत हिंदू-मुसलमान दोघं असतात. परंतु याला कारण बेकारी व दारिद्रय. ही बेकारी व हे दारिद्रय दूर झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी समाजरचना बदलली पाहिजे. एक लक्षाधीश, एक भिक्षाधिश हे उपयोगी नाही. स्त्रियांची अब्रू कारखानदार, जमीनदार व सावकार हेच खरोखर नेत आहेत. मिलमध्ये स्त्री कामगारांची काय दशा असते ! त्यांच्या झिंज्या ओढतात. त्यांची शरीरं भ्रष्ट करतात. आणि जमीनदारांच्या जहरी नजरांच्या लीला सांगेन तर महाभारत होईल. तो सावकारही येतो व खुशाल घरदार जप्त करतो. शेतकर्‍याची बायको, तिला धड वस्त्र नसतं. 'बायको वीक व पैसे दे' असं हे सावकार निर्लज्जपणे सांगतात. मागे अहमदाबादची एक सत्यकथा एक कामगार सांगत होता. रात्र झालेली. एक स्त्री साबरमतीच्या तीरी गेली. पटकन नेसूचे सोडून ती पाण्यात शिरली. लगेच बाहेर येऊन तेच वस्त्र पुन्हा तिनं गुंडाळलं. तिला दुसरं वस्त्र नव्हतं. त्याच अहमदाबादेत कोटयवधी चार कपडा निर्मिला जातो. कोटयवधी किसान कामगारांच्या अब्रूचं हे विराट हसं. हे का मुसलमान करीत आहेत? तुम्हाला एखादा मुसलमान हिंदू भगिनीची अब्रू घेताना दिसतो. अलबत, त्याला शासन झालं पाहिजे. परंतु तो गुंडच असतो आणि तसे काही आपलेही गुंड असतात. परंतु हे दुसरे धनमत्त गुंड गावोगाव शहरोशहरी सावकार, जमीनदार, इनामदार, कारखानदार यांच्या रूपानं ऐटीनं वावरत आहेत. त्यांचं पारिपत्य कोणी करावयाचं? कोणते मुस्लिम सभेचे मुल्ला, कोणते हिंदुमहासभेचे धर्मभास्कर ही अब्रूची विराट हत्या थांबविण्यासाठी पुढे येत आहेत? ही आमची हरघडी प्रत्येक गावी केली जाणारी बेअब्रू थांबवता का, असा सरळ प्रश्न किसान आता विचारू लागले आहेत. कामगार करू लागले आहेत. जोपर्यंत ही पिळवणूक आहे, तोपर्यंत कोठली कोणाची अब्रू, कोठली माणुसकी, कोठला धर्म? बरिसाल प्रांतात किसानांनी प्रचंड मोर्चा काढला, लीगवाले व सभावाले तेथे गेले. त्यांच्यात हिंदू व मुसलमान अशी फूट पाडू लागले, परंतु ते हिंदु-मुसलमान किसान म्हणाले,''आमच्या अब्रूचे वाटोळे जमीनदार करीत आहेत. त्यांच्याविरुध्द उभारता का बंड?'' कसे उभाराल, ते तर तुम्हाला फंड पुरवतात, तुमच्या सभा म्हणजे नबाबांच्या व श्रीमंतांच्या. चालते व्हा. ही वरपांगी धर्माची दांभिक अफू आम्हास नको. धर्म म्हणजे पिळवणूक थांबविणे. श्रमणार्‍याला मान. लोडाशी बसणार्‍या खुशालचेंडूला लाथ. मग तो हिंदू असो वा मुसलमान असो. निघा बांडगुळांनो, आम्ही हिंदू व मुसलमान नाही, आम्ही सारे चिरडले जाणारे किसान आहोत.'' सभावाले, लीगवाले काळेठिक्कर पडले. ते हिंदू-मुसलमान किसान ''कमानेवाले खायेंगे, इसके लिये कुच भी हो; इन्किलाब झिंदाबाद, किसान-कामगार एकजूट, कोण पाडणार आमच्यात फूट, थांबवू श्रीमंतीची लूट.'' अशी गर्जना करीत निघून गेले. तो इतिहास सांगताना अब्दुलचे डोळे मधून मधून पेटत होते भावनांनी त्याचे सारे अंग थरथरत होते.

''मी जातो. तुमच्या संघटनेतून स्फूर्ती घेऊन मी जातो. महाराष्ट्रातील किसान-कामगारांस ती देतो.'' मुकुंदराव म्हणाले.

''हा लाल हातरुमाल, आमची आठवण घ्या.'' नाटू म्हणाला.

''खिशातील हातरुमालही लाल?'' मुकुंदरावांनी आश्चर्याने विचारले.

''लाल बावटा सतत जवळ हवा. ओठात हवा, पोटात हवा. हृदयाशी हवा. डोक्यात हवा. काम करून डोकं फिरू लागलं, घामाघूम झालं की खिशातील हा लाल रुमाल आम्ही काढतो. घाम पुसताना हा रुमाल डोक्याला सांगतो, 'तुझी दैना मी थांबवीन. भिऊ नको.' पोटात भूक लागलेली असावी; डोळयांतून पाणी यावं. हा लाल रुमाल डोळे पुसून म्हणतो, 'तुझी भूक मी मिटवीन, भिऊ नको.' हा रुमाल आमचा परमेश्वर, हा लाल रुमाल आमचा आधार.'' हलधर म्हणाला.
मुकुंदरावांनी त्या लाल रुमालाचे चुंबन घेतले. त्यांनी तो खिशात ठेवला.

''इन्किलाब झिंदाबाद !'' सारे गर्जले. मुकुंदराव निघून गेले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel