१३. स्वातंत्र्य-दिन

स्वातंत्र्य दिन जवळ येत होता. हिंदुस्थानने स्वतंत्र होण्याचा निश्चय कधीच जाहीर केला होता. दरवर्षी तो दिवस आला म्हणजे साजरा होई. परंतु त्या उत्सवात खरा अर्थ ओतला जात नसे. 'स्वातंत्र्य म्हणजे काय' ते जनतेला कळले पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे बेकाराला काम, पोटभर अन्न; स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला राहायला घरदार; स्वातंत्र्य म्हणजे सर्वांना शिक्षण; स्वातंत्र्य म्हणजे सर्वांच्या अब्रूचे रक्षण; स्वातंत्र्य म्हणजे कर्जातून किसानाची मुक्तता; त्याची शेती त्याला परत मिळणे, डोईजड शेतसारे भरपूर प्रमाणात कमी होणे; स्वातंत्र्य म्हणजे कामगाराला पगारी रजा, म्हातारपणी पेन्शन, कामाची शाश्वती, त्याला राहायला चाळी, कामाचे कमी तास, स्वातंत्र्य म्हणजे अशा अशा गोष्टी. म्हणून या स्वातंत्र्याच्या लढयात सामील व्हा. दूर उदासीन राहू नका. असे जर आपण किसान-कामगारांस सांगू तर स्वातंत्र्यदिनात पाहा कसे तेज येईल.

मुकुंदरावांनी स्वातंत्र्य-दिनाच्या दिवशी हजारो किसान कामावर एकत्र आणण्याचे ठरविले. विजेसारखा प्रचार त्यांनी सुरू केला. अनेक तरुण त्यांना या कामी मिळाले. दिवस ना रात्र, सकाळ ना दर. सारखा प्रचार सुरू.

ते शिवतरला गेले. शांता व मोहन यांचे ते गाव. गावात जागृती होती. विचार आला होता. मोहन तेथे नव्हता. तरी त्याचे मित्र आतून पेटवीत होते. गीता तेथे ज्ञान देत होती. मुकुंदरावांचे रात्री व्याख्यान होते. बायांनी फेरी काढली. मुलांनी फेरी काढली. आसपासच्या गावीही दवंडी देण्यात आली. रात्री प्रचंड सभा भरली. शेकडो बाया आल्या होत्या. हजारो किसान जमले होते.

मुकुंदराव म्हणाले,''जगाच्या पोशिंद्यांनो, तुम्ही आज मरत आहात. सारे तुम्हाला  लुटीत आहेत, कुटीत आहेत. आता मान वर करा. म्हणा की, श्रमणारे जे आम्ही, त्या आमचा आधी हक्क. आधी आम्हाला पोटभर खायला पाहिजे. ज्याचा प्रथम हक्क असायला पाहिजे त्यालाच आज गचांडी मिळाली आहे. सरकार म्हणते, ''तहशील भर आधी माझा. माझं देणं आधी दे. राजसत्तेचा आधी हक्क दे, नाहीतर तुरुंगात टाकीन.'' सावकार येतो व म्हणतो, ''माझं देणंआधी दे, नाही तर मेल्यावर नरकात जाशील, जिवंतपणी तुरुंगात जाशील. माझा आधी हक्क.'' गादीवरचे संतमहंत, महाराज, बोवा येतात व म्हणतात, ''धर्म आधी करावा. देवाला आधी द्यावं. आम्हाला दिलं म्हणजे देवाला मिळेल. धर्माला विसर नको. बाकी सारं विसरं.'' सरकारचा हक्क आहे, सावकाराचा हक्क आहे, धर्ममार्तंडांचा हक्क आहे. परंतु श्रमणार्‍यांचा हक्क आहे की नाही? त्याच्या बायकोला नीट धड लुगडं नेसण्याचा हक्क आहे की नाही? त्याच्या मुलांना पोटभर खाण्याचा हक्क आहे की नाही? त्याला स्वतःला जगण्याचा हक्क आहे की नाही? शेतकरी व त्याची मुलंमाणसं यांना का फक्त जगायचा हक्क?''

''नाही; हे सारं बदललं पाहिजे. गायीचे दूधही पिळून पिळून काढू लागू तर ती सात्त्वि गाय लाथ मारते. म्हणते, ''पाप्या, आता नाही रे कासेत काही.' परंतु आपण शेतकरी गायीहून गाय झालो. आता माणसं होऊ या. सांगू या सर्वांना बजावून की, 'आधी मला व माझ्या मुलाबाळांना पोटभर खाऊ दे. उरलं तर तुम्हाला देऊ. आम्ही शेतकरी मरू तर मराल तुम्ही. तुम्ही जगावं म्हणून आम्हाला नीट जगू दे.''

''भय सोडा.'' भित्यापाठीमागं ब्रह्मराक्षस.' एक गोष्ट आहे. एक होता राक्षस. त्याने एक नोकर ठेवला होता. त्या नोकराला तो सारखं काम सांगे. 'काम न करशील तर खाऊन टाकीन.' असे तो म्हणावयाचा. एक दिवस तो नोकर अगदी दमून गेला होता. परंतु राक्षसानं सांगितलं, ''२० कोस चालून जा व हा निरोप सांगून ये.' तो नोकर वाटेत मरून पडला असता. नोकरा म्हणाला, 'ऐवीतेवी मरणारच; तर जात नाही म्हणून सांगू या. त्याने राक्षसाला तसे सांगितलं. राक्षस म्हणाला, 'खाऊन टाकीन.' नोकर म्हणाला, 'खा एकदा.' राक्षसानं खाल्लं का? राक्षस खाता तर त्याचं काम कोण करिता? त्या नोकरानं भीती सोडली. म्हणून त्याला बरे दिवस आले. तुम्ही भीती सोडा. जर कोणी म्हणेल, सरकार तुरुंगात घालील, म्हणा की, घालू दे. गोळी घालील, म्हणा की, घालू दे. नाही तरी मरतच आहोत.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel