प्रेतयात्रा निघाली. आपला खांदा लागावा अशी सर्वांना इच्छा. शांतेचा देह आम्ही उचलतो असे कामगार बाया म्हणाल्या. ''असं करीत नाहीत'' कोणी तरी म्हणाले, ''ही क्रांती आहे'' गीता चिमण्या क्रांतीला पोटाशी धरून म्हणाली. शेवटी शांतेचा देह भगिनींनी उचलला. मोहनचा पुरुषांनी उचलला. शांतेच्या पाठीमागे चार-चारांच्या रांगेत हजारो स्त्रिया उभ्या होत्या. मोहनच्या पाठीमागे चार-चारांच्या रांगेत हजारो पुरुष होते. दोन्ही रांगांमधून लाल बावटयाचे स्वयंसेवक हाताला झेंडे घेऊन व्यवस्था ठेवण्यासाठी अंतराअंतरावर खडे होते.

''इन्किलाब झिंदाबाद'' गाणे सुरू झाले. विद्यार्थीसंघाचा बँड पुढे होता. एक मोठा तिरंगी झेंडा व एक मोठा लाल झेंडा फडकत होता. क्रांतीचा आवाज दशदिशांत घुमू लागला. दोन्ही चिता रचल्या गेल्या. शांता व मोहन यांचे पवित्र आत्मे आधीच देवाकडे गेले होते. त्यांचे देह अग्निनारायणाने आत्मसात केले. मुकुंदरावांनी अग्नी देण्यापूर्वी दोनच शब्द सांगितले, ''मोहन-शांता सर्वांना शांत राहा व लढा असे सांगत आहेत. मोहन व शांता आपल्या जीवनात अमर आहेत. त्यांचे देह गेले. त्यांचा संदेश सदैव आपणांजवळ आहे.

मंडळी माघारी फिरली. कामगार-मैदानावर पुन्हा मिरवणूक जाणार होती व तेथून विसर्जन पावणार होती. इतक्यात ''मजुरांच्या लॉर्‍या आल्या, लॉर्‍या आल्या.'' एकच हाक आली. सारे वातावरण प्रक्षुब्ध झाले. मुकुंदरावांनी कण्यांतून ''शांत राहा, काल रात्री सांगितलेलं विसरू नका.'' असे गंभीरपणे सांगितले. बँड माघारी गेला. सर्वांच्या पुढे मुकुंदराव व आनंदमूर्ती झेंडे धरून उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे दयाराम व अहमद, त्यांच्या पाठीमागे पार्थ आणि मग मागे हजारो स्त्री-पुरुषांचा व्यवस्थित चार-चार रांगी समूह लॉर्‍यांना अडवायला निघाला जथा. बंदूकवाले पोलिस गर्दी करू लागले. जथ्याला अडवू लागले. गर्दी होणार, दंगा होणार, अशी लक्षणे दिसू लागली. ती पाहां, एक कामगार-भगिनी चवताळून निघाली. मॅनेजरच्या अंगावर थुंकणारी रमा, तीच ही. कोठे निघाली ही वाघीण, ही नागीण? कोणावर आहे रोख? ती पाहा शिपायाच्या हातातील बंदूक तिने ओढून घेतली. तो शिपाई बावळटासारखा पाहात राहिला. रमाने बंदूक उंच केली. ''ही पाहा साम्राज्य सरकारची बंदूक आपल्या हाती आली. ही पाहा खरी सत्ता आपल्या हाती आली !'' ती ओरडली. इन्किलाबची कानठळया बसविणारी गर्जना झाली ती बंदूक याच्या हातून त्याच्या हाती अशी नाचू लागली. परंतु रामदास एकदम धावून आला.

''चावटपणा काय आहे हा? गंभीर परिस्थिती आहे, समजत नाही ?'' त्याने ती बंदूक परत दिली. ''गोळीबार करू नका. आम्ही शांत राहतो !'' मुकुंदराव सांगत होते.

इतक्यात मोटार लॉर्‍या दुसर्‍या रस्त्याने जात आहेत असे दिसले. मुकुंदराव धावले. वार्‍याच्या वेगाने निघाले. एकच 'क्रांती' अशी आरोळी त्यांनी मारली. ती पाहा पहिली लॉरी येत आहे. तिच्या पाठीमागून आणखी येत आहेत. मुकुंदराव लाल झेंडा घेऊन उभे राहिले. परंतु लॉरीवाला ऐकेल का? तिच्यातील कामगार 'अरे, अरे' म्हणत आहेत तोच ती लॉरी मुकुंदरावांना पाडून त्यांच्या अंगावरून गेली ! तोच आनंदमूर्ती तेथे येऊन पडले. त्यांच्याही अंगावरून गेली ! आतील कामगारांनी ड्रायव्हरला ओढले. त्याने थांबविली गाडी. हजारो कामगार धावले. दोन जीव तेथे रक्तबंबाळ होऊन पडले होते. कामगार खवळले. रामदास मोटार लॉरीवर उभा राहिला. तो कर्ण्यातून सर्व शक्तीने व निश्चयी स्वरात म्हणाला, ''शांत राहा, मुकुंदराव शेवटल्या श्वासाने शांत राहा सांगत आहेत आणि हे बाहेरच्या कामगारांनो, तुम्ही आमचे भाऊ. तुमच्या मायबहिणी, तुमचे भाऊ येथे उपाशी मरत असताना, तेजस्वीपणे लढत असताना, तुम्ही येता कसे? कामगारांनी का कामगारांची मान कापावी? आम्ही तुम्हाला पाप करू देणार नाही. तुमच्या लॉर्‍यासंमोर आमच्या रक्ताचे सडे घालू. तुम्हांला पापापासून परावृत्त करण्यासाठी. आम्ही आमचे प्राण जमिनीवर पसरू. माणुसकी असेल तर खाली उतरा व शूर संपवाल्या कामकर्‍यांत मिसळा. हे पाहा थोर मुकुंदराव येथे रक्तानं न्हाले आहेत. आसुरी भांडवलशाही, रक्ताला चटावलेली भांडवलशाही, तिला साथ देणार का लाथ देणार? टाका उडया खाली ! या यज्ञमूर्तींचं हे बलदान पाहा, उतरा खाली.''

मोटार लॉर्‍यांतील कामगार खाली उतरले. त्यांनी खाली माना घातल्या. एकच इन्किलाबची रणगर्जना झाली. परंतु मुकुंदराव व आनंदमूर्ती ! त्यांचे अद्याप प्राण होते. त्यांना दवाखान्यात नेण्याचे ठरले. तिकडे कामगार मैदानावर प्रचंड सभा सुरू झाली. दयाराम, अहमद, नथू तिकडे गेले. रामदास व पार्थ हुतात्म्यांना घेऊन दवाखान्यात आले. ''हिंसा-अहिंसेचा लढा'' मुकुंदराव म्हणाले. 'दिव्य लढा' आनंदमूर्ती म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel