९. प्रद्योत

''माया, सूत काय कातीत बसलीस? सुटीमध्ये मौज करावी; चल आपण कॅरम खेळू.'' प्रद्योत म्हणाला.

''सूत कातण्यातच मला मौज वाटते.'' ती म्हणाली.

''हे कोठून घेतलंस तू वेड? पूर्वी तर सूत पाहून पळत होतीस, खादी नको म्हणत होतीस.'' त्याने विचारले.

''प्रद्योत, आपण रोज बदलत असतो. पूर्वीचे आज नसतो. आजचे उद्या नसणार.'' लहानपणी मला भातुकलीचा खेळ आवडे. आज आवडतो का? लहानपणी बाहुलाबाहुलीची मी लग्नं लावीत असे. आज लावीन का? माणूस पूर्वीचं काही टाकतो, नवीन काही घेतो, नाही का?'' तिने विचारले.

''माया, तुला आठवतो तो दिवस? लुटूपुटीच्या लग्नात तू झाली होतीस नवरी व मी झालो होतो नवरा. मी नवरा म्हणून तुला मी मारलं. तू रडत बसलीस.'' प्रद्योत आठवण करून देत होता.

''तो तुमच्याकडचा गडी लाटू कोठे रे गेला? बायकोला आपला मारायचा.'' मायेने विचारले.

''तो कलकत्त्याला गिरणीत गेला. आमच्याकडची नोकरी त्यानं सोडली. खेडयातील सुखाची नोकरी नव्हती त्याच्या नशिबी.'' प्रद्योत म्हणाला.

''सुखाची रे कसली? किती रे देत असा त्याला पगार?'' मायेने विचारले.

''वर्षाला ७५ रुपये. थोडे का झाले? शिवाय उरलेलं अन्न त्यालाच मिळे. आमचे फाटके कपडे त्याच्याच घरी जात.'' तो म्हणाला.

''म्हणजे तुमच्या घरातील टाकाऊ वस्तूंचा तो उकिरडा होता. टाकाऊ वस्तू लाटूच्या अंगावर. प्रद्योत, ७५ रुपयांत कसं रे त्यानं राहावं? किती तरी त्याची मुलं. देव दरिद्री नारायणांना मुलंही भरपूर देतो. बिचारी ! लाटूची बायको किदरून जाई. मग ती मुलांना मारी. तिनं मुलांना मारलं की लाटू तिला मारी.'' माया उद्वेगाने म्हणाली.

''दररोज, तो प्रकार पाहूनच तर मी ठरविलं की बायकोला रडवतो तो नवरा. एके दिवशी मी बाबांना विचारलं,'' तुम्ही आईला रडवता का? तर बाबांनी थोबाडात मारून मात्र मला रडवलं.'' प्रद्योत म्हणाला.

''प्रद्योत, लहानपणी लुटुपुटीतल्या बायकोला रडवलंस. मोठेपणी खर्‍याखुर्‍या बायकोला नको हो रडवू.'' माया म्हणाली.

''मोठेपणाच्या बायकोचा अद्याप पत्ता कोठे आहे. मिळेल तेव्हा खरी.'' तो म्हणाला.

'' न मिळायला काय झालं? आता तू डॉक्टर होणार, श्रीमंत होणार. किती आईबापांना वाटत असेल की, प्रद्योतसारखा मुलगा  आपल्या मुलीला मिळावा म्हणून.'' ती हसून म्हणाली.

''आईबाप ढीग म्हणतील; परंतु हल्ली आईबापांचं ऐकतो कोण?  तुझे आईबाप जर तुला म्हणतील की, ''प्रद्योतशी लाव लग्न,' तर तू होशील तयार?'' त्याने विचारले.

''इश्श ! असे रे काय विचारतोस? परंतु तुला देऊ का मुलगी पाहून, शांतिनिकेतनातून देते एखादी आणून. कशी पाहिजे ते सांग. नृत्यकला जाणणारी, का गायन जाणणारी, का काव्य करणारी.'' तिने विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel