''मोहन, तू कठोर आहेस.'' ती म्हणाली.

''मी म्हटलंच होतं की, माझे हात राठ आहेत. ताठदाठर आहेत.'' तो म्हणाला.

''हातासारखंच हृदयही आहे वाटतं?''तिने विचारले.

''शेतकर्‍याला आत-बाहेर नाही.'' तो म्हणाला.

''आले नाही तो जा म्हणतोस.'' ती म्हणाली.

''तू माझ्या हृदयात कायमची आहेस. नवीन काय यायचं?'' तो म्हणाला.

''खरंच का जाऊ? तुला आजारी टाकून जाऊ?'' तिने विचारले.

''खरंच जा. देशाचा आजार बरा कर. माझा आजार आता गेला. तुझं बोलणं ऐकलं. तुझा हात हाती घेतला. औषध मिळालं. जा. नाचव झेंडे. गा गाणी.'' तो म्हणाला.

शांता उठून गेली. परंतु पुन्हा जवळ येऊन बसली.

''जातेस ना?'' त्याने प्रश्न केला.

''उठू की तुला लुटू?'' ती म्हणाली.

''शांता, गरिबाची लूट थांबवावयाची आहे. विसरू नकोस.''

''मोहन श्रीमंत आहे. प्रेम श्रीमंत आहे. त्याला आधी लुटून मला प्रेमश्रीमंत होऊ दे.'' ती म्हणाली.
मोहन काही बोलला नाही.

''जाते हो मोहन.'' शांता म्हणाली.

''शांता शहाणी आहे. गरिबांच्या सेवेला वाहून घेण्याचं रामदासानं व तिनं ठरविलं आहे.'' तो म्हणाला.

''दत्तकविधानाचे दिवशी.'' ती म्हणाली.,

''जा आता, उशीर होईल. मुकुंदरावास भेट.'' तो म्हणाला.

शांता गेली. मुकुंदरावांना ती भेटली. ती हिंडू फिरू लागली. रामपूरच्या विद्यार्थ्यांची सभा झाली. तेथे शांता बोलली. आज तिचा पहिलास प्रसंग सभेत बोलण्याचा. परंतु भावनेचे तेज काही और असते. ती शिवतरलाही गेली. ती आपल्या वडिलांच्या घरी गेली. वडील बोलले नाहीत. घरी जेवली. गीता वगैरे भगिनी तिला भेटल्या. शांतेला पाहून त्यांना अधिकच स्फुरण चढले.

मुकुंदरावांनी एक मोटार लॉरी भाडयाने घेतली. हजारो हस्तपत्रके त्यांनी छापून घेतली. ''पिकलं नसेल तर शेतसारे भरू नका. किसानांनो, उठा, तहशील कमी झाले पाहिजेत. खंड कमी झाले पाहिजेत. कर्जाचे प्रश्न सुटले पाहिजेत. शेतकर्‍यांची जमीन राहिली पाहिजे. परंतु त्यासाठी सर्व शेतकर्‍यांनी भय सोडून जागृत झाले पाहिजे.'' अशा अर्थाची ती पत्रके होती. मोटारीत स्वयंसेवक व इतर मित्र असत. मोटारीला तिरंगी व लाल झेंडे झळकत. गाणी गात खेडोपाडी जागृत करीत ती मोटार जाई. जेथे मोटार जात नसे तेथे ते उतरत. पायी जाऊन येत, पुन्हा मोटार निघे. ती मोटार नव्हती धावत, ती स्फूर्तीची लाट धावत होती. वाटोवाट पत्रके फेकली जात होती. रस्त्यात कोणी दिसला की हात हलवून हस्तपत्रक उडविले जाई. वाटेचा वाटसरू ते घेई. रस्त्याच्या आसपास शेतांतून कामे करणारे धावत येत व त्या आशेच्या, नवसंदेशाच्या वार्‍यावर उडणार्‍या पत्रिका हृदयाशी धरीत. त्या पत्रिका म्हणजे, किसानांचा वेद झाला. एखादा गुराखी, एखादा शेतमजूर ते पिवळे पत्रक, ते लाल पत्रक खेडयात घेऊन जाई. सारे जमत व वाचत.

''एकच का आणलंस? आणखी का नाही आणलीस?'' लोक त्याला विचारत.

''एकच मिळालं.'' तो म्हणे.

मुकुंदरावांनी किसान-गीते रचनू ती छोटी पुस्तके जिल्हाभर वाटली. किसानांची उपनिषदे, किसानांचे वेद, किसानांच्या भगवद्गीता जन्मू लागल्या. शनिमाहात्म्याची पुस्तके पळू लागली. क्रांतीची पुस्तके घरीदारी शिरू लागली. नवचैतन्य येऊ लागले.

धनगावला मुकुंदराव आले. कामगारांची प्रचंड सभा झाली.

''किसान स्वातंत्र्याच्या दिवशी उठवणार. एकत्र येणार. तुम्हा का गिरणीत साचा चालवत बसणार? किसान व कामगार म्हणजे राष्ट्राची फुफ्फुसं. ही फुफ्फुसं बरोबर चालली पाहिजेत. एकच हवा दोघांतून खेळत राहिली पाहिजे. स्वातंत्र्यदिनी तुम्ही हजारोंच्या संख्येनं किसानांच्या मेळाव्यात येऊन मिळा. गंगा व यमुना एकत्र येऊ दे. खर्‍या स्वातंत्र्याच्या सागरास जाऊन मिळू देत.''

अशक्त व आजारी मोहन तेथे आला होता.

तो भावनांनी थरथरत मुकुंदरावांजवळ आला.

''मी एक गाणं म्हणू का?'' त्याने विचारले.

''म्हण.'' मुकुंदराव म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel