''अक्षयबाबू, सावित्रीनं पती अल्पायुषी आहे हे माहीत असूनही तो वरला. मी केवळ माहेरच्या आशेनं मनातील प्रेम का विसरू? ते का शक्य आहे? आकाशात चंद्र नाही तो इतर तार्यांना अवकाश, पूर्ण चंद्र फुलला की त्याचाच प्रकाश. आपल्या हृदयात लहानमोठया प्रेमाचे निष्कलंक तारे अनंत असतात. परंतु पतिप्रेमाच्या पूर्ण चंद्रासमोर सारे मागे पडतात. चंद्राला थोडासा कलंक असला तरी तो चंद्र, तारे कितीही निर्मळ असले तरी तारे ते तारे. ते चंद्राची जागा घेऊ शकत नाहीत. हृदयातील अंधार दूर करू शकत नाहीत. भावाबहिणीचं प्रेम, आईबापाचं प्रेम, मित्राचं प्रेम, मायलेकराचं प्रेम, सारी प्रेमंच; परंतु जीवनातील पतिपत्नीचं म्हणून जे प्रेम आहे ते अनंत आहे. अपार आहे. हे प्रेम असून इतर मिळतील तर अधिकस्य अधिकं फलम् । परंतु हे प्रेम न मिळून इतर मिळत असतील तर त्यात काही राम नाही.'' माया प्रेममीमांसा करीत म्हणाली.
''माया, तुझी निराशा मी करू इच्छीत नाही. प्रद्योतवर तुझं प्रेम नसलं तर तो संसारही सुखाचा होणार नाही. उगीच तुला आगीत उडी घे असं मी कसं सांगू? मला म्हातार्याला मात्र दुःख आहे. प्रद्योतची निराशा त्याला जाळील. तो हल्ली खोलीत बसून राहतो, परंतु आपण तरी काय करणार?'' अक्षयबाबू म्हणाले.
''तुम्ही मला आशीर्वाद द्या.'' माया म्हणाली.
''तूही माझ्या मित्राची मुलगी. तुझा संसार सुखाचा होवो. तुझं मी शुभच चिंतीन.'' ते म्हणाले.
अक्षयबाबू निघून गेले. मायाने ते सर्व फोटो, ती चित्रे पुन्हा आवरून ठेवली. इतक्यात तिच्या नावाचे पत्र आले. ते पत्र घेऊन ती धावत आली. आपल्या पलंगावर ते पत्र घेऊन ती बसली. तिला ते पत्र फोडवेना. महाराष्ट्रातील ते पत्र होते. कल्पनेत आनंद होता. पत्रात काय काय असेल याच्या कल्पनेत ती तन्मय झाली. शेवटी तिने हलक्या हाताने ते पत्र फोडले-वाचले.
प्रिय माया,
तू माया नसून महामाया आहेस. तिकडे लांब राहून तेथून माझ्याभोवती जाळं गुंफीत आहेत. हलकेच मला येथून तिकडे ओढीत आहेस. माये, तुझी ओढ मला लागली आहे. तुझ्या बाबांना मला पत्र लिहायला सांग, म्हणजे मी येईन, एरव्ही कसा येऊ?
तुझ्यासाठी एक चिमुकलं घर मी बांधलं आहे. तू ये व सजव. घराभोवती मी फुलझाडं लाविली आहेत. तू आलीस म्हणजे तुझं स्वागत ती करतील. तुला पाणी घालावं लागेल त्यांना. मीही तुला त्यात मदत करीन. दोघांनी मिळून फुलं फुलवू. संसार सुखाचा करू.